रेल्वेचा फूटबोर्ड आणि फलाट यांच्यामध्ये असलेली पोकळी दरवर्षी शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत असल्याच्या मुद्दय़ावरून मुंबईत रान पेटल्यानंतर फलाटाची कमाल उंची ९२ सेंटीमीटपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला रेल्वेबोर्डाने अखेर मंजुरी दिली आहे.
रेल्वे बोर्डाच्या नियमावलीनुसार रूळांपासून फलाटाची उंची किमान ७६ सेंटीमीटर ते कमाल ८४ सेंटीमीटर असणे अपेक्षित होते. मात्र नवीन गाडय़ा या उंचीच्या फलाटावर उभ्या राहिल्यानंतर गाडय़ांचा फूटबोर्ड आणि फलाट यांच्यात कमालीची पोकळी राहत होती. काही ठिकाणी तर ही पोकळी एक फूट आठ इंच एवढी जास्त होती. त्यामुळे गाडय़ांमध्ये चढताना महिला, ज्येष्ठ नागरिक यांना प्रचंड त्रास होत होता. तसेच या पोकळीत पडल्याने दरवर्षी किमान २५ लोकांचा बळीही गेल्याची आकडेवारी आहे.
फलाटांची कमाल उंची ९२ सेंटीमीटर एवढी वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याच्या वृत्तास रेल्वे बोर्डाचे अभियांत्रिकी सदस्य सुबोध जैन यांनीही दुजोरा दिला. यामुळे आता ७४ स्थानकांतील फलाटांची उंची आठ ते १६ सेंटीमीटपर्यंत वाढणार आहे.