News Flash

नव्या बंबार्डिअर गाडय़ांचा चेंडू रेल्वे बोर्डाच्या कोर्टात

मुंबईच्या उपनगर मार्गावर अधिक हवेशीर आणि कोऱ्या करकरीत बंबार्डिअर गाडय़ा रूळावर येण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

| January 15, 2015 03:04 am

मुंबईच्या उपनगर मार्गावर अधिक हवेशीर आणि कोऱ्या करकरीत बंबार्डिअर गाडय़ा रूळावर येण्याचा मार्ग सुकर झाला आहे. बुधवारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या गाडीच्या अधिक चाचण्या घेतल्या. या चाचण्यांनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या गाडीसाठी एक प्रमाणपत्र रेल्वे बोर्डाकडून मागवले आहे. रेल्वे बोर्डाने हे प्रमाणपत्र दिल्यानंतर या गाडय़ांच्या सुरक्षेबाबतचा प्रस्ताव मुख्य सुरक्षा आयुक्तांकडे पाठवण्यात येईल. मात्र सुरक्षा आयुक्तांच्या चाचण्यांनंतर या गाडय़ा २६ जानेवारीपर्यंत रेल्वेमार्गावर येण्याची शक्यता बळावली आहे.
उपनगरीय रेल्वेमार्गावर धावणाऱ्या गाडय़ांपैकी बहुतांश गाडय़ा आपल्या आयुर्मानापेक्षाही सात ते आठ वर्षे जास्त काळ चालत आहेत. या जुन्या गाडय़ा अतिशय कोंदट असल्या, तरी गाडय़ांच्या कमतरतेमुळे त्या चालवणे भाग आहे. त्यामुळे उपनगरीय रेल्वेसाठी नव्या ७२ गाडय़ा दाखल करण्याची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पातही झाली होती. बंबार्डिअर कंपनीच्या या गाडय़ा नोव्हेंबर २०१३मध्ये मुंबईत चाचणीसाठी आल्या होत्या. मात्र तब्बल वर्षभरानंतरही त्यांना रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे सुरक्षा प्रमाणपत्र मिळू शकले नाही.
अखेर सोमवारी मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाचे संचालक प्रभात सहाय यांनी ही गाडी २६ जानेवारीपर्यंत रूळांवर येईल, असे सांगितल्यानंतर बुधवारी रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी या गाडीची अंतिम चाचणी केली. गाडीच्या वाहतुकीत काहीच अडचण नसल्याचे बक्षी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. दरम्यान, आता रेल्वे बोर्डाकडून या गाडीच्या आकाराबाबत सूट असलेले प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे ते म्हणाले. हे प्रमाणपत्र आल्यानंतर हा अहवाल मुख्य सुरक्षा आयुक्तांकडे पाठवला जाईल. त्यांच्या मान्यतेनंतर सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात येईल, असे बक्षी म्हणाले.
ही सर्व प्रक्रिया होण्यास नऊ ते दहा दिवस लागले, तरी येत्या २६ जानेवारीपर्यंत ही गाडी पश्चिम रेल्वेवर दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या ७२ गाडय़ांपैकी दोन गाडय़ा पश्चिम रेल्वेमार्गावर येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 3:04 am

Web Title: railway board new local trains
टॅग : Railway Board
Next Stories
1 मुंबईतील मोकळ्या जागांचा वापर वाहनतळांसाठीच करा
2 ‘आरटीओ’तून दलालांना हद्दपार करण्याचे आदेश
3 ‘ग्रामविकास’च्या परिषदेचा खर्च ‘युनिसेफ’चा
Just Now!
X