मध्य रेल्वेवर ४४, पश्चिम रेल्वेवर ५८ नवीन पादचारी पूल बांधणार; वर्षभरात ३३ पुलांचे काम पूर्ण

वर्षभरापूर्वी एल्फिन्स्टन रोड (आताचे प्रभादेवी) स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर नवीन पादचारी पूल, पुलांची दुरुस्ती अशा कामांचा धडाकाच मध्य व पश्चिम रेल्वेने लावला आहे. दोन्ही मार्गावर मिळून १०२ नवीन पादचारी पूल उभारण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या ३३ पुलांची कामेही येत्या वर्षभरात पूर्ण केली जाणार आहेत.

प्रभादेवी स्थानकात २९ सप्टेंबर २०१७ रोजी पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू आणि ३९ जण जखमी झाले होते. प्रवाशांची वाढती संख्या आणि तुलनेत अरुंद पूल, फलाट यांचा प्रश्न या दुर्घटनेमुळे ऐरणीवर आला. दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी नवीन पादचारी पूल, पुलांचा विस्तार, अतिरिक्त सरकते जिने आदी कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानंतर मध्य व पश्चिम रेल्वेने पादचारी पुलांच्या कामांना सुरुवात केली. पश्चिम रेल्वेने १३ पादचारी पुलांची कामे हाती घेतली.

ज्या ठिकाणी दुर्घटना झाली त्या प्रभादेवी स्थानकात पूर्व ते पश्चिम असा पूल लष्कराकडून उभारण्यात आला. याशिवाय मध्य रेल्वेला जोडणारा १२ मीटर रुंदीचा पूलही इथे उभारण्यात आला. याचबरोबर सांताक्रूझ, लोअर परळ, बोरिवली, विरार, माटुंगा रोड, जोगेश्वरी (नवीन पूल व फलाट ३ व ४ वरील पुलाची दुरुस्ती) गोरेगाव, खार रोड स्थानकांत नवीन पूल व अस्तित्वात असलेल्या पुलांचा विस्तार, पायऱ्यांची दुरुस्ती आदी कामे करण्यात आली. याबरोबरच २५ नवीन पादचारी पूल येत्या वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय ३३ नवीन पुलांना मंजुरी देण्यात आली आहे. या ३३ पुलांचे काम मार्च २०२० पर्यंत होईल, अशी अपेक्षा आहे. अशा तऱ्हेने पश्चिम रेल्वे मार्गावर ५८ नवे पादचारी पूल प्रवाशांच्या सेवेत येतील.

मध्य रेल्वेनेही वर्षभरात २० पादचारी पूल उभारले आहेत. पुढील वर्षभरात ४४ पादचारी पूल उभारण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. यातील लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातील पुलाचे काम ७२ दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे.

सरकते जिन, उद्वाहने

मध्य रेल्वे मार्गावर सध्या ६९ सरकते जिने आहेत. ९ जिन्यांची कामे प्रगतिपथावर आहेत, तर १७२ सरकत्या जिन्यांना मंजुरी मिळाली आहे. वर्षभरात २८ उद्वाहने सेवेत आली असून आणखी ६५ सेवेत येणार आहेत. त्यापैकी पाच उद्वाहनांची कामे सुरू आहेत. यामुळे या मार्गावरील एकूण उद्वाहनांची संख्या ३३ वर जाईल. पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर ८९ सरकते जिने उभारले जाणार आहेत. १६ जिने येत्या वर्षभरात सेवेत येतील. त्याचबरोबर गेल्या वर्षभरात १० उद्वाहने सेवेत आली आहेत. एकूण ५४ उद्वाहने उभारण्याचे नियोजन आहे.

पश्चिम रेल्वेवर २६ पुलांची कामे

पश्चिम रेल्वेने सांगितले की, येत्या वर्षभरात २० पादचारी पूल आणि सहा उड्डाणपुलांची दुरुस्ती केली जाणार आहे. गेल्या वर्षांत ११ पादचारी पूल आणि ५ उड्डाणपुलांची दुरुस्ती करण्यात आली आहे.