आरामदायक प्रवासासाठी
आरामदायक प्रवासासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काही नव्या प्रकारच्या गाडय़ांची घोषणा केली आहे. यात अंत्योदय, दीन दयाळू डबे, तेजस, हमसफर आणि उदय या गाडय़ांचा व डब्यांचा समावेश आहे.
अंत्योदय एक्सप्रेस – या गाडीतील सर्व डबे अनारक्षित प्रवाशांसाठी असतील. ही गाडी लांब पल्ल्याची असून सुपरफास्ट श्रेणीतील असेल.
दीन दयाळू डबे – काही गाडय़ांमध्ये अनारक्षित प्रवाशांना सामावून घेण्यासाठी चार दीन दयाळू डबे जोडण्यात येणार आहेत. या डब्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि मोबाइल चार्ज करण्यासाठी जादा पॉइंट्सची सोय असेल.
हमसफर ट्रेन – ही गाडी वातानुकूलित तृतीय श्रेणी स्वरूपाची असेल. या गाडीत जेवणाची सुविधा हवी असल्यास तीदेखील उपलब्ध होईल.
तेजस ट्रेन – भारतातील भविष्यातील रेल्वे कशी असेल, याचे तेजस हे उत्तम उदाहरण राहणार आहे. ही गाडी १३० किमी प्रतितास आणि त्यापेक्षा जास्त वेगाने जाणार असून या गाडीत मनोरंजन, स्थानिक खाद्यपदार्थ, वाय-फाय आदी सुविधा असतील.
उदय ट्रेन – उत्कर्षित वातानुकूलित डबलडेकर यात्री (उदय) ही गाडी प्रचंड प्रवासी असलेल्या मार्गावर रात्रीच्या प्रवासासाठी सुरू करण्यात येणार आहे.

तिकीट सुविधा
* उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या अनारक्षित प्रवाशांना तातडीने तिकीट मिळावे यासाठी ‘हँड हेल्ड टर्मिनल’चा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना विविध ठिकाणांहून तिकिटे खरेदी करणे शक्य होईल. तसेच त्यासाठी कमीत कमी पायाभूत सुविधा उभारण्याची गरज आहे.
* एटीव्हीएमद्वारे क्रेडिट व डेबिट कार्डचा वापर करून प्लॅटफॉर्म तिकीट मिळण्याची सोय
* २०२० पर्यंत प्रत्येक प्रवाशाचे तिकीट निश्चित (कन्फर्म) होईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.
’ हेल्पलाइन क्रमांक १३९द्वारेही आरक्षण रद्द करण्याची सवलत. आरक्षण करताना नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावर वन टाइम पासवर्ड पाठवण्यात येईल. त्यानंतर आरक्षण रद्द होऊ शकेल.
* महत्त्वाच्या स्थानकांवर बारकोड तिकिटे देण्यात येतील. तसेच या स्थानकांवर तिकीट स्कॅनर आणि स्थानकात शिरण्यावर नियंत्रण बसवण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकृत बारकोड तिकिटाशिवाय विनातिकीट प्रवाशांना स्थानकात शिरणे अशक्य. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग होणार.
* तात्काळ तिकीट आरक्षण करताना होणाऱ्या तिकीट दलालीला आळा घालण्यासाठी आणि त्यातील गैरप्रकार कमी करण्यासाठी देशभरात तात्काळ तिकिटे विकणाऱ्या खिडक्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार.

परिचालनासाठीचे थांबे व्यावसायिक
लांब पल्ल्याच्या गाडय़ांना काही तांत्रिक कारणांसाठी विशिष्ट स्थानकांवर थांबा दिला जातो. मात्र या स्थानकांवरून प्रवाशांना त्या गाडय़ांचे आरक्षण मिळत नाही. मात्र यापुढे हे सर्व थांबे केवळ परिचालनासाठी न ठेवता ते व्यावसायिकदृष्टय़ाही वापरले जाणार आहेत. म्हणजेच या ‘ऑपरेशनल’ थांब्यांच्या ठिकाणांहून प्रवाशांना आरक्षण करणे शक्य होणार आहे. यात रेल्वेचे काहीच नुकसान नसून उलट रेल्वेला अधिक प्रवासी मिळतील.

अपघात कमी करण्यासाठी..
रेल्वेने अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जपान व कोरियाच्या राष्ट्रीय रेल्वे संशोधन संस्थांची मदत घेण्याचे ठरवले आहे व हंगामी उपायांसाठी डॉ. काकोडकर यांच्या समितीने सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी केली जात आहे. कमी उंचीचे प्लॅटफॉर्म अपघात टाळण्यासाठी मुंबईत तयार केले जातील. वेग, स्वच्छता, कार्यक्षमता, साधनांचा वापर यात रेल्वे वेगाने प्रगती करेल. कौशल्याधारित मनुष्यबळासाठी रेल्वे विद्यापीठही सुरू करण्यात येत आहेत. रेल्वेच्या ७ कोटी प्रवाशांच्या सोयीसाठी अंत्योदय एक्स्प्रेस व दीनदयाळ डबे अनारक्षित करण्यात येत आहेत. तेजस योजनेतील गाडय़ांचा वेग ताशी १३० कि.मी केला जाईल. वातानुकूलित उदय एक्सप्रेस ही दुमजली गाडी सुरू केली जाईल. तिकीट विक्री केंद्रे वाढवली जातील, बारकोड तिकिटे, १३९ हेल्पलाइन, ३० हजार जैव स्वच्छतागृहे, खानपान सेवेत अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांना आरक्षण, त्यात महिलांना ३३ टक्के आरक्षण, एलईडी, करमणूक साधने व इतर सुविधा असलेले स्मार्ट डबे, दोन हजार स्थानकांवर २० हजार इलेक्ट्रॉनिक पडदे, जीपीएस डिस्प्ले सुरू करण्यात येतील.