मासिक किंवा त्रमासिक पासधारकांना आता कुठूनही कोणत्याही स्थानकापर्यंतचे यात्राविस्तार तिकिट काढता येणार नाहीच शिवाय ज्या वर्गाचा पास असेल त्याच वर्गाचे यात्राविस्तार तिकिट काढता येईल, असा बिनडोक निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी पश्चिम रेल्वेवर सुरू झाली असून मध्य रेल्वेवरही पुढील आठवडय़ात हा ‘यात्रासंकोच’ अवतरणार असल्याने मुंबईकर रेल्वे प्रवाशांमध्ये संताप खदखदत आहे.
मासिक किंवा त्रमासिक पासवर उल्लेख असलेल्या दोन स्थानकांच्या टप्प्यापुढे प्रवास करायचा असेल, तर यात्राविस्तार तिकीट फायदेशीर ठरते. आतापर्यंत हे तिकीट कोणत्याही स्थानकावरून काढण्याची सुविधा होती. मात्र हे तिकीट फक्त पासवर उल्लेख असलेल्या दोन स्थानकांव्यतिरिक्त फक्त जंक्शन स्थानकांवरच काढता येईल, असा नियम रेल्वे बोर्डाने केला आहे. पश्चिम रेल्वेवर गेल्या चार-पाच दिवसांपासून हा नियम अमलात आणण्यात आला आहे.
या नियमाबद्दल प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कोणत्याही स्थानकांवरून यात्राविस्तार तिकीट काढले, तरी आम्ही पैसे तेवढेच देतो. मग ठरावीक स्थानकांवरच या तिकिटाची सोय का, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. मध्य रेल्वेवर गुरुवारपासून हा नियम लादला जाण्याची शक्यता आहे.
या नियमाला प्रवासी संघटनांनी कडाडून विरोध केला असून या नियमाविरोधात आम्ही रेल्वे प्रशासनाकडे निवेदन देणार आहोत, असे प्रवासी संघटनांनी स्पष्ट केले.
या नियमानुसार कल्याण, दिवा, ठाणे, कुर्ला आणि दादर याच स्थानकांवर यात्राविस्तार तिकिटे मिळू शकतील.  सध्या पश्चिम रेल्वेवर दादर, माहीम, बोरिवली अशा मोजक्याच स्थानकांवर ही सुविधा आहे.