News Flash

जलद गाडय़ांच्या थांब्याला रेल्वे फाटकाचा अडसर!

जलद गाडय़ांना थांबा देण्यासाठी सध्याच्या अप आणि डाऊन धिम्या मार्गिकांची रचना बदलावी लागणार आहे.

दिवा स्थानकातील रेल्वे फाटक दोन मार्गामध्ये येत असल्याने प्रकल्पाला विलंब
दिवा स्थानकात जलद गाडय़ा थांबवण्यासाठी ऑक्टोबर महिन्याची नवीन कालमर्यादा निश्चित करणाऱ्या मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणालाही (एमआरव्हीसी) मध्य रेल्वेप्रमाणेच या स्थानकातील रेल्वे फाटकाने हैराण केले आहे. जलद गाडय़ांना थांबा देण्यासाठी एमआरव्हीसी या स्थानकात नवीन धिमी मार्गिका बांधत आहे. मात्र या मार्गिकेआड रेल्वे फाटक येत असून ते फाटक आणि त्याची केबिन मागे सरकवल्याशिवाय काम पूर्ण होणे अशक्य आहे. त्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने दिवा स्थानकातील जलद गाडय़ांचा थांबा रखडला आहे.
दिवा स्थानकात प्रवाशांनी हिंसक आंदोलन केल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या स्थानकात जलद गाडय़ांना थांबा देण्याची मागणी मान्य केली होती. हे काम एमआरव्हीसीतर्फे करण्यात येत असून त्यासाठी जून २०१६ ही कालमर्यादा आखण्यात आली होती. मात्र हे काम पुढील तीन महिने किमान पूर्ण होणार नसल्याचे एमआरव्हीसीने सांगितले होते. त्यामागे दिवा स्थानकातील रेल्वे फाटक कारणीभूत असल्याचे एमआरव्हीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी स्पष्ट केले.
जलद गाडय़ांना थांबा देण्यासाठी सध्याच्या अप आणि डाऊन धिम्या मार्गिकांची रचना बदलावी लागणार आहे. त्यासाठी सध्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या पश्चिम बाजूने डाऊन धिमी मार्गिका बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तर सध्या डाऊन धिमी असलेली मार्गिका मुंबईकडे येणाऱ्या धिम्या गाडय़ांसाठी वापरण्यात येणार आहे. याच मार्गिकेच्या पश्चिम बाजूला लागूनच सध्याचे रेल्वे फाटक आहे. या फाटकाची केबिनही पूर्वीच्या तिकीट घराच्या बाजूला आहे. मात्र नव्या रचनेप्रमाणे या फाटकापल्याड एक मार्गिका येणार असल्याने प्रचंड गोंधळ होण्याची शक्यता आहे. याआधी हे फाटक तसेच ठेवून नव्या मार्गिकेच्या बाजूला दुसरे फाटक तयार करण्याचा आराखडा होता, मात्र त्यामुळे दिवा येथील रहिवाशांना अडचण येणार आहे. तसेच रेल्वेच्या परिचालनातही त्यामुळे प्रचंड गोंधळ उडणार असल्याचे लक्षात आल्यानंतर एमआरव्हीसीने हे फाटक आणि केबिन बंद करून नव्या मार्गिकेच्या बाजूला हलवण्याचे काम सुरू केले आहे. मात्र त्यासाठी पुढील तीन ते चार महिन्यांचा अवधी लागणार आहे आणि त्यामुळेच दिवा येथील जलद गाडय़ांचा थांबा रखडला आहे, असे सहाय यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2016 2:58 am

Web Title: railway crossing gate bars for fast trains stop
Next Stories
1 पालिकेचा एक लाख वृक्षारोपणाचा संकल्प
2 रेल्वेलगतच्या वस्त्यांमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांचे समुपदेशन वर्ग!
3 पावसाळ्यात सखल भागाजवळ पालिकेचे गणवेशधारी कर्मचारी
Just Now!
X