रेल्वेमार्गात टाकला जाणारा काही टन कचरा गोळा करून तो वाशी खाडीत टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला अंधारात ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्यावरणाशी संबंधित कोणतीही गोष्ट करण्याआधी घ्यावी लागणारी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगीही रेल्वेने घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे हा कचरा वाशी खाडीजवळील रेल्वेच्या सखल भागात टाकण्याऐवजी तो मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत टाकण्यात यावा; मग तो पालिका उचलून क्षेपणभूमीत नेऊन टाकेल, असा नवा पर्याय  पालिका प्रशासनाने सुचविला आहे.
रेल्वेमार्गावरील कचरा उचलण्याबाबत रेल्वे आणि मुंबई महापालिका यांच्यात याआधी बैठका आणि पत्रव्यवहार झाले आहेत. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रकाश पाटील यांच्या माहितीप्रमाणे या प्रकरणी पालिकेने आपली भूमिका पत्रालारे स्पष्ट केली होती. या पत्रात पालिकेने रेल्वेसमोर कचरा उचलण्याचा पर्याय ठेवला होता. रेल्वेने रेल्वेमार्गातील कचरा गोळा करून तो पालिकेच्या हद्दीत आणून ठेवावा. पालिका त्या ठिकाणी आपले ट्रक पाठवून हा कचरा उचलून घेण्यास आणि क्षेपणभूमीत नेण्यास तयार आहे, अशी भूमिका पालिकेने घेतल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले. या जागाही रेल्वेने त्यांच्या सोयीप्रमाणे ठरवण्याचे स्वातंत्र्य पालिकेतर्फे देण्यात आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.मात्र, रेल्वेमार्गालगत अशा जागा खूपच कमी असून दर दिवशी दोन-अडीच हजार पोती कचरा तेथे नेणे जिकिरीचे असल्याने हा पर्याय व्यावहारिक नाही, असे रेल्वेच्या मुंबई विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

पर्यावरणाशी संबंधित कोणतीही क्रिया करण्यापूर्वी राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्यासंबंधी परवानगी घेणे अनिवार्य असते. मात्र रेल्वेने अशी कोणतीही परवानगी घेतली नाही.
– नंदकुमार गुरव, विभागीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ