गर्दीच्या काळात मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या ई-तिकिटांची विक्री करणाऱ्या अनधिकृत दलालांविरोधात केलेल्या कारवाईत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभाग सुरक्षा दलाने गेल्या पाच महिन्यांत एकूण २३७ दलालांची धरपकड केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनधिकृतपणे तिकीट विक्री करणाऱ्या दलालांची संख्या या वर्षी वाढली आहे.

सुट्टीकाळात रेल्वेची तिकिटे मिळवण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू असते. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन तिकीट काढताना प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागतो. रेल्वेने संकेतस्थळावर तिकीट विक्री सुरू केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच प्रतीक्षा यादी कशी येते, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. यात मात्र दलालांचे जाळे कार्यरत असते हेच स्पष्ट होते. त्याला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दल, दक्षता पथक, आयआरसीटीसी व मुंबई विभागीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून ई-तिकिटांची विक्री करणाऱ्या ठिकाणी छापे टाकले जातात.

गेल्या पाच महिन्यात नियमित गाडय़ांबरोबरच रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाडय़ाही सोडल्या होत्या. त्याचा अनधिकृत दलालांकडून गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाने (सीएसएमटी ते कसारा, खोपोली, लोणावळापर्यंत)जानेवारी ते मार्च २०१९ पर्यंत केलेल्या कारवाईत ८६ प्रकरणांत १०६ दलालांना अटक केली आहे. २०१८ मध्ये याच पाच महिन्यात ६१ प्रकरणात ७५ दलालांना अटक केल्याची नोंद होती.

पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाच्या मुंबई विभागानेही (चर्चगेट ते वापी, सुरतपर्यंत) या वर्षीच्या पाच महिन्यात केलेल्या कारवाईत १०८ प्रकरणांत १३१ दलालांची धरपकड केली असून गेल्या वर्षी १३० दलाल पकडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या सीएसएमटी कार्यालयाने त्याच्या अखत्यारीत येणाऱ्या भागांमध्ये धाडी टाकल्या. चार महिन्यात १६ दलाल पकडले, तर कल्याण रेल्वे सुरक्षा दलाने १३, मानखुर्द रेल्वे सुरक्षा दलाने १५, भायखळा १२ आणि ठाणे रेल्वे सुरक्षा दलाने १० जणांना पडकले आहे.

* ई-तिकीट काढण्यासाठी अनधिकृत दलालांकडून विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. त्यामुळे तिकिटे अधिक झटपट काढली जातात.

* रेल्वे स्थानकातील पीआरएस तिकीट खिडक्या सुरू होताच रेल्वेच्या सॉफ्टवेअरमध्ये शिरकाव करून काही सेकंदातच तिकिटे आरक्षित केली जातात. अनधिकृतबरोबरच अधिकृत दलालही त्यांना ई-तिकीट काढण्यासाठी दिलेल्या वैयक्तिक आयडीचा गैरपावर करतात.

* आयआरसीटीसीने दिलेल्या एका विशेष आयडीवरून त्यांना आखून दिलेल्या आरक्षण क्षमतेनुसार जास्त तिकिटे काढतात. त्यांना दिलेल्या निर्धारित वेळेआधीच वैयक्तिक आयडीवरून तिकीट काढत असल्याचे निदर्शनास आले आहे.