दोन वर्षांपासून हद्दपार होणार, अशी चर्चा असलेल्या सीव्हीएम कूपन्सना पुन्हा एकदा एका वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. सीव्हीएम कूपन्स प्रवाशांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. मात्र सध्या सीव्हीएम कूपन्सना अधिक सशक्त पर्याय पूर्णपणे उभा करणे अशक्य असल्याने या कूपन्सना मुदतवाढ देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
मध्य रेल्वेने सीव्हीएम कूपन्सला हद्दपार करण्याची तयारी दाखवत जेटीबीएस आणि एटीव्हीएम या नव्या प्रणालीवर भर दिला आहे. पश्चिम रेल्वेवर मात्र अजूनही १७ टक्के प्रवासी हे सीव्हीएम कूपन्समार्फतच तिकिटे काढतात.
गेल्या वर्षी ही कूपन्स ३१ मार्च २०१४नंतर हद्दपार होतील, असे सांगण्यात आले होते. मात्र गुरुवारी एका वर्षांने वाढ मिळाली आहे.
मध्य रेल्वेने सीव्हीएम कूपन्सना पयार्य म्हणून आपल्या स्थानकांवरील एटीव्हीएमची संख्या वाढवली. सध्या मध्य रेल्वेच्या एकूण तिकीट विक्रीपैकी फक्त ५ टक्के तिकीट विक्री सीव्हीएम कूपन्सद्वारे होते. पश्चिम रेल्वेवर मात्र सर्व स्थानकांमध्ये मिळून फक्त ४० एटीव्हीएम मशिन्स आहेत. दरम्यान,येत्या वर्षभरात सीव्हीएमसाठी हा पर्याय निर्माण करण्याची तयारी असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत् चंद्रायन यांनी सांगितले.