२२० कामगारांवर रेल्वे प्रकल्प कामांची मदार; पादचारी पूल, मार्गिकांची कामे रखडली

सुशांत मोरे, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदीत आर्थिक चणचण आणि करोनाच्या भीतीमुळे लाखो कामगारांनी परप्रांतातील आपल्या गावचा रस्ता धरल्याचा फटका ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’च्या (एमआरव्हीसी) विकासकामांना बसत आहे. अनेक ठिकाणी मनुष्यबळाअभावी रेल्वेची कामे रेंगाळली आहेत. टाळेबंदीतही ठाणे ते दिवा पाचवा सहावा मार्ग आणि १२ स्थानकांतील पादचारी पुलांच्या कामांना गती देण्याचा प्रयत्न रेल्वेने के ला. मात्र हे प्रकल्प अवघ्या २२० कामगारांच्या जीवावर पेलावे लागत असल्याने त्यांची गती अत्यंत संथ आहे.

गेल्या दहा वर्षांपासून ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यास मेल-एक्स्प्रेस गाडय़ांना स्वतंत्र मार्ग मिळून मध्य रेल्वेचे लोकल वेळापत्रक सुधारण्यास मदत मिळेल. अनेक अडथळ्यांमुळे या प्रकल्पाला गती मिळालेली नाही. एमआरव्हीसीकडून गेल्या सहा महिन्यांत कामाला गती दिली गेली. त्यात करोनामुळे टाळेबंदी लागली आणि या प्रकल्पावर काम करत असलेल्या कामगार, मजुरांनी परराज्याची वाट धरली. त्यामुळे प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. पावसाळ्यात मोठी कामे हाती घेतली जात नाहीत, तर छोटी व किरकोळ कामे करण्यावर भर दिला जातो. परंतु ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गातील त्या कामांनाही वेग मिळालेला नाही. त्यामुळे डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणारे काम लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मनुष्यबळाअभावी कामे रेंगाळली

नाहूर, टिटवाळा, शहाड, कसारा, अंबरनाथ, वसई रोड स्थानक, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेन्ट्रल, गोरेगाव, वांद्रे, खार स्थानकात पादचारी पुलांची कामे सुरू होती. परंतु ही कामेही मनुष्यबळाअभावी रेंगाळली आहेत. टाळेबंदीआधी ९२० कामगार विविध प्रकल्पांवर काम करत होते. यात पादचारी पूल व ठाणे ते दिवा पाचवा सहावा मार्गासह अन्य किरकोळ कामांचा समावेश होता. टाळेबंदी लागल्यानंतर के ंद्र, राज्य व रेल्वे प्रशासनाने दिलेल्या मंजुरीमुळे ५६७ कामगार, मजूर कार्यरत होते. मात्र करोना रुग्णांची वाढलेली संख्या, धास्ती यांमुळे कामगार परराज्यात गेले. सध्या फक्त २२० कामगारांवरच काही कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. काही कामगार, मजुरांना कं त्राटदारांमार्फत बोलावण्यात येत असून पावसाळ्यानंतर ते परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या असलेले २२० मनुष्यबळ हे पावसाळ्यानंतर ८७५ पर्यंत करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती देण्यात आली.