मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या फलाटांवर उभ्या असलेल्या गाडय़ांच्या शौचकुपात आगी लावणाऱ्या समाजकंटकाचा ताबा आता गुप्तचर विभागाने घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अब्दुल वाहीद शेख (२८) असे या व्यक्तीचे नाव असून त्याला ७ मे रोजी अटक करण्यात आली होती. रेल्वे पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान त्याने दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाल्यानेच अब्दुल गुप्तचर विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याचे समजते. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाच्या प्रमुखांनी याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
छत्रपती शिवाजी टर्मिनस फलाटांवर उभ्या असलेल्या गाडय़ांच्या शौचकुपात आगी लागण्याच्या घटना ३० एप्रिल व ४ मे रोजी घडल्या होत्या. या घटनांनंतर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी फलाटांवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचे चित्रीकरण तपासले. त्यात एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे आढळून आले. रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली. चौकशीत त्याचे नाव अब्दुल शेख असल्याचे समजले. गाडय़ांना आगी लावल्याचे त्याने कबूल केले. मात्र, आपल्याला मशीद बंदर येथील एका खोलीत राहणाऱ्या व्यक्तीने या आगी लावण्यास सांगितल्याचे अब्दुलने पोलिसांना सांगितले. अब्दुलने दिलेल्या या पत्त्यावर मात्र कोणीही आढळले नाही. त्यामुळे अब्दुलवरील संशय बळावला. या पाश्र्वभूमीवर गुप्तचर विभागाने अब्दुलचा ताबा घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. अब्दुलच्या ताब्याबद्दल मात्र रेल्वे सुरक्षा दलाचे मुंबई विभागप्रमुख आलोक बोहरा यांनी कानावर हात ठेवले. परंतु रेल्वे सुरक्षा दलांच्या चौकशीनंतर आता विविध तपास संस्था अब्दुलची चौकशी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.