23 September 2020

News Flash

रेल्वेचा प्रथम श्रेणी प्रवास महागणार

रेल्वे अर्थसंकल्पात प्रवाशांवर भाडेवाढीचा कोणताही बोजा टाकणार नसल्याचे सांगत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी विरोधकांच्या विरोधातील हवा काढून टाकली

| March 3, 2015 04:19 am

रेल्वे अर्थसंकल्पात प्रवाशांवर भाडेवाढीचा कोणताही बोजा टाकणार नसल्याचे सांगत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी विरोधकांच्या विरोधातील हवा काढून टाकली खरी, मात्र अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातील एका घोषणेने ही विरोधाची धार तीव्र होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात सेवाकर १२.३६ टक्क्यांवरून १४ टक्के केल्याने त्याचा फटका रेल्वेच्या प्रथम श्रेणी आणि वरील दर्जाच्या प्रवाशांना बसणार आहे. प्रथम श्रेणी व वरील दर्जाच्या प्रवासासाठी तिकिटांमध्ये पाच ते दहा रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ उपनगरीय रेल्वे प्रवासात प्रथम श्रेणीच्या मासिक आणि त्रमासिक पाससाठीही लागू होण्याची चिन्हे आहेत.
देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असणारी रेल्वे ही प्रवाशांसाठी एक सेवा असल्याने रेल्वेच्या तिकिटांवर सेवाकर लागू होतो. मात्र हा कर फक्त प्रथम श्रेणी व वरील दर्जाच्या तिकिटांवरच लागू होतो. रेल्वे ही फायदा कमावणारी संस्था नसल्याने एकूण सेवाकरात रेल्वेला ७० टक्के सूट देण्यात येते. त्यामुळे १२.३६ टक्क्यांपैकी फक्त ३.७०८ टक्के सेवाकर आतापर्यंत रेल्वेच्या तिकिटांवर लावला जात होता. त्यानुसार विरार-चर्चगेट मार्गावरील प्रथम श्रेणीच्या मासिक पाससाठी ४५ रुपये सेवाकर भरावा लागत होता.
याबाबत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता सेवाकरात वाढ झाल्यास त्याचा परिणाम रेल्वेच्या तिकीट दरांवर होईल, असे त्यांनी कबूल केले.

* अरुण जेटली यांनी सेवाकर १२.३६ टक्क्यांवरून १४ टक्के केला आहे. त्यामुळे ७० टक्क्यांची सूट मिळून रेल्वेसाठी सेवाकर ४.२% एवढा आहे.
* या टक्केवारीनुसार प्रत्येक तिकिटामागे किंवा मासिक वा त्रमासिक पासमागे पाच ते दहा रुपये जास्त द्यावे लागतील.
* परिणामी चर्चगेट-विरार या मार्गावरील प्रथम श्रेणीचा मासिक पास १२७५ वरून १२८० रुपये होणार आहे.
* तीन महिन्यांच्या पाससाठी १० रुपयांची वाढ होईल. ही वाढ प्रथम श्रेणी, वातानुकूलित थ्री टियर, वातानुकूलित टू टियर, वातानुकूलित प्रथम श्रेणीसाठी लांबपल्ल्याच्या गाडय़ांनाही लागू होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 4:19 am

Web Title: railway first class travel become costly
टॅग Local Train
Next Stories
1 सहस्रबुद्धे किंवा शायना यांना उमेदवारी?
2 ठाण्यात धावत्या रिक्षातून मुलींची उडी
3 मेट्रो कोरशेडच्या अभ्यासासाठी समिती
Just Now!
X