रेल्वेतून प्रवास करणारे सुमारे एक हजार प्रवासी दर महिन्याला आपले सामान गाडीतच विसरत असतात. रेल्वेच्या हेल्पलाइनवर आलेल्या कॉल्सद्वारे ही माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे गेल्या सात महिन्यांत प्रवासी एकूण तब्बल ६० लाख रुपयांची रोकड गाडीत विसरले आहेत. तर दर दिवशी दोन लॅपटॉप गाडीत विसरले जातात. मात्र त्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी रेल्वेच्या हेल्पलाइनवर मदत मागितली जाते. त्याचा मोठाच ताप रेल्वे प्रशासनाला होतो.
दररोज लाखो प्रवासी मुंबईसह राज्यातील उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवास करत असतात. दर महिन्याला त्यापैकी सुमारे एक हजार प्रवासी आपले सामान विसरत असल्याची माहिती रेल्वेच्या हेल्पलाइनच्या आकडेवारीतून समोर आली आहे. जानेवारी ते जुले २०१४पर्यंत या हेल्पलाइनवर सामान हरविल्याच्या तब्बल ७ हजार १६० तक्रारी केल्या गेल्या. या विसलेल्या सामानांमध्ये प्रवाशांच्या पाकिटातील तब्बल ६० लाख ९ हजार रुपयांचाही समावेश आहे. त्याचबरोबर ४०९ लॅपटॉप, ७५ कॅमेरे आणि २३८ मोबाइलही प्रवासी गाडीत  ट्रेनमध्ये विसरले होते.
९८३३ ३३१ १११ या हेल्पलाइनवर संपर्क केल्यास तात्काळ संबंधित रेल्वे स्थानकाला सूचना देऊन सामान शोधून देण्यास मदत केली जाते. चालू वर्षांतील ७ हजारपैकी दीड हजार प्रवाशांना त्यांचे सामान परत मिळवून देण्यात रेल्वेला यश आल्याचे हेल्पलाइनचे प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर जाधव यांनी सांगितले. एखाद्या प्रवाशाने या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास तात्काळ आम्ही गाडी कुठे पोहोचली आहे, याचा अंदाज घेऊन संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना कळवतो. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष दूरध्वनी पुरविण्यात आले आहेत. मग त्या गाडीच्या डब्याची तपासणी करून सामान ताब्यात घेतले जाते आणि प्रवाशांची ओळख पटविल्यानंतर त्याला ते परत केले जाते. ही हेल्पलाइन अत्यंत लोकोपयोगी असून प्रवाशांनी तिचा वापर करावा, असे आवाहन रेल्वेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय बर्वे यांनी केले.