21 September 2020

News Flash

‘सक्षम’ जीवनवाहिनीसाठी..

मुंबई नागरी वाहतूक योजना किंवा एमयूटीपी या योजनेची आखणी करण्यात आली.

देशातील सर्वात पहिली प्रवासी रेल्वेगाडी मुंबईपासून धावली, हे ऐतिहासिक वास्तव रेल्वे आणि मुंबई यांच्यातील नात्याची जाणीव करून देणारे आहे. उपनगरीय रेल्वेमार्गावरील कुर्ला, शीव, दादर, परळ, भायखळा, वांद्रे, ग्रँट रोड आदी स्थानके ही रेल्वेच्या इतिहासात अत्यंत प्राचीन आहेत. तेव्हापासूनच मुंबईच्या एका टोकापासून किंबहुना मुंबई महानगर प्रदेशातून मुंबईत रोजगारासाठी येणाऱ्यांची ने-आण उपनगरीय रेल्वे करत आहे. मध्य आणि पश्चिम हे याच रेल्वेचे दोन विभाग!

रेल्वेच्या आकडेवारीनुसार सध्या या दोन्ही विभागांमध्ये मिळून दर दिवशी ७३ ते ७५ लाख प्रवासी उपनगरीय रेल्वेमार्गाने प्रवास करतात. पश्चिम रेल्वेवर १३०० आणि मध्य रेल्वेवर १६०० पेक्षा जास्त उपनगरीय सेवा दर दिवशी चालवल्या जातात. त्यासाठी २५० हून अधिक गाडय़ांची देखभाल-दुरुस्ती होत असते. हा व्याप खूप मोठा असला, तरी प्रवाशांच्या वाढत्या संख्येसाठी पुरेसा नाही. उपनगरीय रेल्वेमार्गाची क्षमता वाढवण्यासाठी नवीन माíगका टाकणे, नवीन मार्ग सुरू करणे, अधिक वेगाने धावतील अशा नव्या गाडय़ा आणणे, त्या अधिक वेगाने चालवण्यासाठी सध्याच्या प्रणालीचे सक्षमीकरण करणे अशा अनेक गोष्टी करण्याची गरज आहे. त्यासाठीच मुंबई नागरी वाहतूक योजना किंवा एमयूटीपी या योजनेची आखणी करण्यात आली. तसेच केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाची (एमआरव्हीसी) स्थापना करून या महामंडळाकडे ही योजना राबवण्याचे अधिकार देण्यात आले.

आतापर्यंत एमयूटीपी-१, एमयूटीपी-२ या योजनांमधील प्रकल्पांची काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही अजूनही चालू आहेत. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने एमयूटीपी-३ या योजनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील लोकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुंबईकरांच्या अनेक समस्यांना दिलासा देणाऱ्या तीन प्रकल्पांची घोषणा नुकतीच केली.

एमयूटीपी-२ योजनेतील ठाणे-दिवा यांदरम्यानच्या पाचव्या सहाव्या माíगकेचे काम या वर्षांअखेरीपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर काही काळाने हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या मार्गावरील बोगद्याचे तसेच महत्त्वाच्या ठिकाणी रेल्वे पूल बांधण्याचे काम पूर्ण झाले असले, तरी काही ठिकाणी रेल्वेमार्ग टाकण्यासाठी जमीन तयार करण्याचे काम चालू आहे. मध्य रेल्वेच्या मदतीने ठाणे-दिवा यांदरम्यान सातत्याने ब्लॉक घेऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कामासाठी नऊ ठिकाणी कट-कनेक्शनचे काम करावे लागणार आहे. गेल्या वर्षी दिवा येथे चार ठिकाणी करायच्या या कामासाठी चार महामेगाब्लॉकचे नियोजन करावे लागले होते. यंदा या नव्या माíगकेसाठी हे ब्लॉक पुन्हा घेतले जातील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा कल्याणपर्यंत पाचव्या-सहाव्या माíगकेवरून जातील. तसेच ठाण्याहून काही लांब पल्ल्याच्या गाडय़ा या माíगकेवर वळवता येतील. त्यामुळे उपनगरीय लोकलसाठीचा मार्ग खुला होणार आहे.

याच योजनेतील सीएसटी-कुर्ला पाचवी-सहावी माíगका या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे कुर्ला ते परळ यांदरम्यानच्या विस्ताराचे काम सुरू झाले आहे. परळ टर्मिनसच्या उभारणीसाठीचे कामही सुरू असून हे काम २०१९ च्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

एमयूटीपी-२ योजनेतील हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प येत्या मार्च महिन्याअखेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या अंधेरीपर्यंतच जाणाऱ्या हार्बर मार्गाच्या गाडय़ा गोरेगावपर्यंत जाणे शक्य होणार आहे.

नवीन घोषणा झालेल्या एमयूटीपी-३ या योजनेत विरार-डहाणू चौपदरीकरण, कर्जत-पनवेल मार्गाचे दुपदरीकरण, कळवा-ऐरोली उन्नत मार्ग व दिघा स्थानक या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. विरार-डहाणू चौपदरीकरणाच्या प्रकल्पासाठी ३३५३ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. एकूण ६४ किलोमीटरच्या या मार्गावर नऊ स्थानके असून त्यात आणखी काही स्थानकांची भर पडणार आहे. त्यासाठीची कामे, सध्या असलेल्या स्थानकांमधील काही बदल, रूळ, रेल्वे पूल, सिग्निलग यंत्रणा आदी महत्त्वाची कामे या प्रकल्पामुळे हाती घेतली जाणार आहे. विरार-डहाणू हा मुंबई महानगर प्रदेशाचा भाग मानला जात नसला, तरी या टप्प्यातील नवनवीन गृहनिर्माण प्रकल्प, औद्योगिक प्रकल्प यांचा विस्तार लक्षात घेता भविष्यात हा मार्ग नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विनासायास डहाणूपर्यंत चालवणे शक्य होणार आहे.

कर्जत-पनवेल हा २८ किलोमीटरचा मार्ग सध्या एका माíगकेवर चालतो. एमयूटीपी-३ योजनेत या मार्गावर आणखी एक माíगका टाकण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. नवी मुंबई आणि रायगड जिल्हा येथील नागरीकरणाचा वेग झपाटय़ाने वाढत आहे. कर्जत-पनवेल या मार्गावर आणखी एक माíगका आल्यानंतर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा कल्याण-कर्जत या मार्गाऐवजी पनवेल-कर्जत मार्गावरून चालवणे सहज शक्य होईल. तसेच पनवेल येथे लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे टर्मिनस विकसित झाल्यानंतर येथून दक्षिणेकडे जाणाऱ्या गाडय़ा सोडता येतील. त्यामुळे कल्याण-कर्जत मार्गावरील लोकल सेवा वाढवणे शक्य होणार आहे.

तिसरा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे कळवा-ऐरोली उन्नत जोडमार्ग! ४२८ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे कल्याणहून वाशीसाठी थेट गाडय़ा सोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे ठाणे स्थानकावरील ताण मोठय़ा प्रमाणात कमी होणार असून प्रवाशांना मोठय़ा प्रमाणात दिलासा मिळणार आहे.  हा मार्ग बनवताना ऐरोली आणि ठाणे यांच्या मध्ये दिघा नावाचे एक नवीन स्थानकही उभारले जाणार आहे.

त्याशिवाय एमआरव्हीसी सीएसटी-पनवेल व वांद्रे-विरार उन्नत रेल्वेमार्गाच्या उभारणीचे कामही हाती घेत आहे. त्यासाठीचे चाचणी अहवाल पूर्ण झाले असून लवकरच या सर्व प्रकल्पांची निविदा प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. सीएसटी-पनवेल जलद उन्नत मार्ग पूर्ण झाल्यानंतर सीएसटी ते पनवेल हे अंतर ४५ मिनिटांमध्ये पार होईल. तर वांद्रे-विरार उन्नत मार्ग पूर्ण झाल्यावर पश्चिम रेल्वेवर सध्या अंधेरी ते विरार यांदरम्यानची गर्दी या नव्या मार्गावर वळेल आणि प्रवाशांना मोठय़ा प्रमाणावर दिलासा मिळेल.

  • सीएसटी-पनवेल जलद उन्नत मार्ग पूर्ण झाल्यानंतर सीएसटी ते पनवेल हे अंतर ४५ मिनिटांमध्ये पार होईल. तर वांद्रे-विरार उन्नत मार्ग पूर्ण झाल्यावर पश्चिम रेल्वेवर सध्या अंधेरी ते विरार यांदरम्यानची गर्दी या नव्या मार्गावर वळेल आणि प्रवाशांना मोठय़ा प्रमाणावर दिलासा मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 1:45 am

Web Title: railway in navi mumbai
Next Stories
1 रत्नागिरी विभागाची आज अंतिम फेरी
2 दुबळ्या शांतिपाठांच्या मृगजळामागे धावण्याची खोड सोडा!
3 कर्जदारांचा ससेमिरा चुकविण्यासाठी आत्महत्येचा बनाव
Just Now!
X