सहा हजार टनांची भर; देशभरातील पेट्रोलपंपांवरील गर्दीचा परिणाम

देशभरात चालू असलेल्या ‘चलनकल्लोळा’मुळे सध्या पेट्रोल पंपांवरील गर्दी प्रचंड वाढली आहे. पेट्रोल पंपचालक ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारत असल्याने अनेक जण या नोटा खपवण्यासाठी गाडीच्या टाक्या भरभरून इंधन भरत आहेत. या मागणीचा थेट परिणाम मध्य रेल्वेच्या इंधन वाहतुकीवर झाला असून गेल्या आठवडय़ाभरात या वाहतुकीत वाढ झाली आहे. याआधी राज्यासह मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगढ या राज्यांच्या काही भागांमध्ये सहा मालगाडय़ांद्वारे इंधनपुरवठा करणाऱ्या मध्य रेल्वेकडून आता ५० डब्यांच्या दोन मालगाडय़ा जादा चालवल्या जात आहेत.

गेल्या आठवडय़ापासून इंधनाच्या वाढत्या मागणीमुळे मध्य रेल्वेच्या मालवाहतूक उत्पन्नात वाढ झाली आहे. मध्य रेल्वेवर मनमाड, पुणे आणि मुंबई येथून मालगाडय़ा देशाच्या विविध भागांमध्ये इंधन घेऊन जातात. मुंबईच्या चेंबूर येथे असलेल्या दोन इंधन कंपन्यांच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांमधून पाइपलाइनद्वारे इंधन पुणे आणि मनमाड येथे पोहोचवले जाते. मुंबई, पुणे आणि मनमाड येथून गेल्या आठवडय़ापर्यंत ५० डब्यांच्या सहा मालगाडय़ा संपूर्ण महाराष्ट्र राज्य, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि छत्तीसगढ या राज्यांचा काही भाग येथे इंधनपुरवठा करत होत्या.

गेल्या आठवडय़ापासून देशभरातील पेट्रोलपंपांवर ५००-१००० रुपयांच्या नोटा खपवण्यासाठी लोकांची वर्दळ सुरू झाली आहे. त्यासाठी लोक आपापल्या गाडय़ांच्या टाक्या पुरेपूर भरून घेण्यासही तयार आहेत. त्यामुळे इंधनाच्या मागणीत वाढ झाल्याचे पेट्रोलपंप ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी सांगितले.

मागणीतील ही वाढ रेल्वेच्या इंधन वाहतुकीतही परावर्तित होत असल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

गेल्या चार दिवसांपासून मध्य रेल्वे सहाऐवजी आठ गाडय़ांमार्फत इंधन वाहतूक करत आहे. यापैकी चार गाडय़ा मनमाड येथून मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश येथे चालवल्या जात आहेत. पुण्याहून एक गाडी कर्नाटकाकडे आणि मुंबईहून तीन गाडय़ा महाराष्ट्रातील इंधनाची तहान भागवण्यासाठी रवाना होत आहेत.

प्रत्येक गाडीत ३००० टन म्हणजेच ३० लाख लिटर इंधन वाहून नेण्याची क्षमता असते. त्यामुळे गेले चार दिवस देशाच्या विविध राज्यांमध्ये मध्य रेल्वेकडून ६० लाख लिटरपेक्षा जास्त इंधनाचा पुरवठा होत आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

एक गाडी बाहेरच्या राज्यांमध्ये जाण्यासाठी मध्य रेल्वे तेल कंपन्यांकडून ४० ते ५० लाख रुपये एवढा आकार घेते. पेट्रोलिअम पदार्थाची वाहतूक करण्यासाठी रेल्वेचे दर जास्त असतात. त्यामुळे गेला आठवडा रेल्वेच्या मालवाहतुकीसाठी चांगला गेल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.