दादर स्थानकातून आसनगाव अर्धजलद लोकल नेहमीची गर्दी घेऊन पुढे निघाली. तोवर दादर स्थानकावर गाडय़ा उशिराने धावत असल्याची घोषणा के ली जात होती. मात्र समोरून एकापाठोपाठ एक जलद गाडी आल्यानंतर लोकांनी घाईने गाडी पकडणे पसंत केले. कुल्र्याला या गाडीत महिलांचा एकच लोंढा चढला. पुढच्याच लोकलमध्ये पेंटाग्राफ तुटून आवाज झाला, ठिणग्या उडाल्या म्हणून त्या लोकलमधून उतरलेल्या महिला प्रवाशांनी मागून येणारी ही गाडी पकडली खरी..पण गाडी पुढे सरकलीच नाही. भरगच्च गर्दीत एकमेकींना खेटून उभ्या असलेल्या महिला प्रवाशांनी गाडी आता पुढे सरकेल, नंतर सरकेल अशी वाट पहात तब्बल तीन तास घालवले. खायला काही नाही, पिण्यासाठी पाणी नाही, डब्यातले दिवेही अधूनमधून साथ देत नसल्याने अक्षरश: घामाची आंघोळ करूनही आहे त्या स्थितीत गाडी कधी हलणार, या एकाच प्रश्नाने त्यांची स्थिती खस्ता झाली होती.

संध्याकाळी घरी परतायची वेळ असल्याने खाण्यापिण्याच्या फंदात न पडता मिळेल त्या गाडीने घर गाठण्यावर सगळ्यांचा भर असतो. मात्र बुधवारच्या दिवसाने अक्षरश: महिला प्रवाशांच्या संयमाची परीक्षा पाहिली. घाटकोपर स्थानक सोडून काही मिनिटांच्या अंतरावर थांबलेली लोकल तीन तास तिथेच ढिम्म उभी होती.

आजूबाजूला जाणारी-येणारी लोकल नाही, नेमकी काय समस्या आहे आणि गाडय़ा हलणार की नाही याबाबत काहीतरी घोषणा रेल्वेकडून अपेक्षित होती.

मात्र तसे काहीच होत नसल्याने प्रत्येकीच्या वाजणाऱ्या घरच्या मोबाइलवर फक्त गाडीत अडकून पडलो आहोत, एवढे एकच उत्तर ऐकायला येत होते. सुमारे तास-दीड तास काढल्यानंतर सगळ्यांचाच धीर सुटत चालला होता. रात्रीच्या अंधारात ट्रॅकवर उतरणेही महिलांना प्रशस्त वाटत नव्हते. त्यामुळे हातावर हात ठेवून गाडी हलण्याची वाट पाहत बसण्याची वेळ सर्वांवर आली होती. त्यातल्या त्यात ज्यांचे पुरुष नातेवाईक, परिचित होते त्यांनी अमुक नावाचं कु णी आहे का? तमकीला निरोप द्याल का, अशी विचारणा करत त्यांच्या नातेवाईकांना खाली उतरवले. सकाळची वेळ असती तर गाडीतून उतरून ट्रॅकवरून चालत गेलोही असतो, पण अंधारात काहीच कळणार नाही, या भीतीने सगळ्यांनी आहे ती परिस्थिती स्वीकारली.

घडय़ाळाचा काटा दहावरून पुढे गेला तसतसे कोणाचेही डबे असतील तर द्या आम्ही खायला तयार आहोत, अशी चेष्टने का होईना, विचारणा करेपर्यंत सगळे भुकेने कळवळले होते. तांत्रिक बिघाड होऊ शकतात पण निदान अशा वेळी रेल्वेने गाडीतील प्रवाशांना परिस्थितीची किमान कल्पना द्यायला हवी, अशी अपेक्षा या महिला प्रवाशांनी व्यक्त केली. .

प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

अतिशय मनस्ताप

सर्वसाधारणपणे मध्य रेल्वेच्या लोकल उशिरानेच धावत असतात. मात्र काल झालेल्या लोकलच्या गोंधळामुळे अतिशय मनस्ताप झाला. विक्रोळीच्या अलीकडे बराच वेळ गाडी थांबली होती त्यात गाडीमध्ये अतिशय गर्दी असल्यामुळे उभे राहण्यासाठीही जागा नव्हती. त्यामुळे दरवाजाजवळ बसूनच सर्व प्रवास केला. जेथे दोन तासाचा प्रवास केला जातो तेथे पाच ते साडेपाच तास प्रवास करावा लागला. महिला तर रडकुंडीला आल्या होत्या. कामावरून दमून आलेल्या महिलांची अवस्था तर वाईट झाली होती. दोन स्थानकाच्या मध्यभागी गाडी उभी राहिल्यामुळे महिलांना उतरून चालत जाणेही शक्य नव्हते. अनेक महिलांनी पुरूष मंडळींच्या मदतीने अंधारात रेल्वे रूळ पार केला. आमच्याकडे तर पिण्यासाठी पाणीही उरले नव्हते. लहान मुले तर भुकेमुळे ओक्साबोक्सी रडत होती. पावसाच्या काही सरींनी मध्यरेल्वेची ही अवस्था होत असेल तर पावसाळा कसा काढायचा या विचाराने भीती वाटत आहे.

-चैत्राली लोंढे, अंबरनाथ

 

अधिक खर्च, रडतखडत प्रवास

तब्येत ठिक वाटत नसल्याने मी ऑफिसमधून लवकर निघाले होते. मात्र, ऐरोली रेल्वे स्थानकावर आले असता रेल्वे अनिश्चित काळासाठी बंद असल्याचे कळले. रेल्वे स्थानकाबाहेर या वेळी जवळपास ३०० ते ४०० प्रवासी रिक्षा, खाजगी गाडय़ा, बसेस यांची वाट पाहत होते. मला अध्र्या तासाने रिक्षा मिळाल्यावर पुढे पोहचता आले. जीथे १० रूपये रोजचा खर्च होतो तिथे शंभराहून अधिक खर्च झाला व दीड तासाचा रडत-खडत प्रवास करत रात्री ११ वाजता घरी पोहचले. पहिल्या पावसाआधीच्याही सरींनी मध्य रेल्वेची ही परिस्थिती झाली असेल तर पुढील चार महिने रेल्वेचा डोक्याला तापच होणार आहे असेच दिसते.

-श्वेता कुलकर्णी, बदलापूर

 

घामाने ओलेचिंब

लोकल पारसिक भोगद्याजवळ २५ ते ३० मिनिटे थांबली होती. लोकलमधील पंखे बंद पडले होते त्यामुळे घामाने ओले चिंब झालो होतो. काहीच कळायला मार्ग नाही आणि त्यात रेल्वेने कुठली घोषणाही केली नव्हती त्यामुळे लोकल बंद व्हायचे नेमके कारण समजणे कठीण झाले होते. नेमक्या गर्दीच्या वेळेत लोकल सेवा बंद झाल्यामुळे जनतेचा पारा चढला होता. शासनाने जनतेला एसी लोकलची स्वप्ने दाखविली आहेत मात्र अडचणीच्या वेळी किमान पंख्याची सोय तरी असावयास हवी होती.

-प्रथमेश देशमुख, बदलापूर

 

मुलाच्या वाढदिवशीच गोंधळाने चीडचीड

ऑफिसमधून घाईने घरी जायला निघालो होतो. मुलाचा वाढदिवस असल्याने घरी सर्वजण वाट पाहत होते. मात्र सी.एस.टी स्थानकावर आल्यावर लोकल बंद असल्याचे कळले आणि चीडचीड झाली. मुलगा घरी वाट पाहत होता. काही वेळाने खोपोली लोकलची घोषणा झाली त्यावेळी आपण लवकर पोहोचू अशी आशा होती. मात्र त्या गाडीसाठीही तासभर वाट पाहावी लागली. घरी पोहोचेपर्यंत साडेतीन झाले. गाडीमध्ये प्रचंड गर्दी होती. उभे राहण्यासाठीही जागा नव्हती. एकंदर हा अनुभव अतिशय त्रासदायक होता. रेल्वेने अडचणीच्या काळासाठी काहीच सोय करून ठेवलेली नाही. स्थानकांच्या मध्ये थांबविण्यात आल्यामुळे गाडीतून उतरणेही अशक्य होते. पावसाळत मध्य रेल्वेची काय अवस्था होईल याचा विचारही केला जात नाही.

-मयूर घोलप, कर्जत