आठवडाभर लोकलच्या गर्दीतून घर-ऑफिस-घर असा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना एक रविवार कुटुंबीयांसह बाहेर जायला मिळतो. पण त्या रविवारीही रेल्वे मेगा ब्लॉकचं काम काढते आणि सगळ्या प्रवासाचा विचका होतो. मेगा ब्लॉकच्या आणि रेल्वेच्या नावाने खडे फोडत मुंबईकर रविवारीही गर्दीतून प्रवास करतात. पण नेमकं काय चालतं मेगा ब्लॉकदरम्यान..
‘नमस्कार, आम्ही मुंबईच्या केंद्रीय सूचना प्रसारण कक्षातून बोलत आहोत. मेन लाइनशी संबंधित कर्मचारी आणि प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे, आज रविवारी मेन लाइनच्या अमुक ते तमुक स्थानकांदरम्यान काही महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामानिमित्त मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांना होणाऱ्या गरसोयीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत..’ रविवारी सुटीच्या दिवशी कुटुंबकबिल्यासकट फिरायला जायचा बेत करून स्टेशनवर पोहोचलेल्या प्रवाशांच्या कानी ही उद्घोषणा ऐकू येते आणि सगळ्या रंगाचा बेरंग होतो. गेली अनेक वष्रे काही रविवारचा अपवाद सोडून जवळपास प्रत्येक रविवारी होणारा हा मेगा ब्लॉक मुंबईकरांसाठी डोकेदुखीचा विषय ठरतो. पण रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी नव्हे, रेल्वेच्या वाहतुकीसाठी हा मेगा ब्लॉक खूप महत्त्वाचा आहे. आठवडाभर दर रात्री मिळणाऱ्या अडीच ते तीन तासांच्या अवधीत रेल्वेची देखभाल दुरुस्तीची कामे होणे शक्य नसते. ही कामे रविवारच्या चार ते पाच तासांच्या मेगा ब्लॉकच्या काळात पार पाडण्याचं आव्हान दर रविवारी रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी यांना पेलावं लागतं.
मेगा ब्लॉक कुठे हे कसं ठरतं?
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर होणारा मेगा ब्लॉक दर आठवडय़ात वेगवेगळ्या ठिकाणी घेतला जातो. कधी ठाणे-कल्याण यांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर, कधी मुलुंड-माटुंगा यांदरम्यान अप जलद मार्गावर, कधी कुर्ला-मानखुर्द दरम्यान दोन्ही मार्गावर, कधी चर्चगेट-मुंबई सेंट्रलदरम्यान अप व डाउन धिम्या मार्गावर. पण या आठवडय़ात ब्लॉकसाठी नेमक्या कोणत्या भागात वेळ द्यायचा, हे ठरवण्यासाठी आठवडाभर रेल्वे कर्मचाऱ्यांची तयारी सुरू असते. रेल्वेची अशी एक स्वतंत्र भाषा आहे. या भाषेत या भागांना सेक्शन म्हणतात. रेल्वेचा कणा मानले जाणारे गँगमन, कीमन, पॉइंट्समन हे कर्मचारी आठवडाभर त्यांना नेमून दिलेल्या सेक्शनमध्ये अक्षरश: रेल्वे रुळांवरून पायी फिरत असतात. दोघादोघांच्या जोडीने फिरणारे हे कर्मचारी त्या सेक्शनमधील रुळांची, सिग्नलच्या पॉइंट्सची आणि अनेकदा ओव्हरहेड वायरची स्थिती तपासतात. एखादा रूळ सीक (हीदेखील रेल्वेचीच परिभाषा. सीक म्हणजे रुळात काही दोष आढळला) आढळला की, त्या जागी लाल रंगाची एक खूण केली जाते. सिग्नल यंत्रणेच्या पॉइंट्समध्ये काही कामे करायची असल्यास, त्याची नोंद ठेवली जाते. त्यानंतर मग या नोंदी विद्युत, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन आणि अभियांत्रिकी अशा तीन विभागांकडे पाठवल्या जातात.
या विभागांकडून मग परिचालन विभागाला एखाद्या ठरावीक सेक्शनमध्ये मेगा ब्लॉक घेण्यासाठी तजवीज करण्यासंबंधी पत्र लिहिले जाते. त्यानंतर परिचालन विभागातील अधिकारी ब्लॉकची वेळ, गाडय़ांचे वेळापत्रक आदी गोष्टींचा विचार करून मग मेगा ब्लॉकचे वेळापत्रक ठरवतात. अनेकदा मेगा ब्लॉक ठाणे-कल्याण या दरम्यान असेल, तर त्या एकाच दिवसात ठाणे-कळवा, दिवा स्थानकाजवळ, ठाकुर्ली-कल्याण अशी टप्प्याटप्प्यातही मेगा ब्लॉकची कामं पूर्ण केली जातात. एखाद्या आठवडय़ात एखाद्या तांत्रिक बिघाडामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असेल, तर त्या आठवडय़ातील मेगा ब्लॉक तो तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी घेतला जातो.
ब्लॉकची पूर्वतयारी
रेल्वेत आणीबाणी वा अपघाती प्रसंगाशिवाय कोणतंही काम अचानक केलं जात नाही. मेगा ब्लॉकही त्याला अपवाद नाही. एखाद्या सेक्शनमध्ये ठरावीक कामांसाठी ब्लॉक घ्यायचा, हे ठरल्यावर जी कामं करायची आहेत त्यांच्यासाठी लागणारं साहित्य जवळच्या मोठय़ा स्थानकावर गुरुवार ते शनिवारच्या काळात आणलं जातं. कामगारांच्या गँगना (गँगमनची गँग असते) त्या त्या ठिकाणी काम लावलं जातं. एका गँगमध्ये साधारण ३५ ते ४० गँगमन असतात. त्यात रुळांचे काम करणाऱ्या गँगमनपासून ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत गरजेनुसार सर्वाचा समावेश असतो. एखाद्या सेक्शनमध्ये रूळ बदलायचे असतील, तर असलेल्या रुळांच्या बाजूला नवे रूळ ठेवले जातात. त्यानंतर मग रविवारी पूर्ण तयारीनिशी मेगा ब्लॉकचे काम सुरू होते.
काम कसं चालतं?
मेगा ब्लॉकदरम्यान होणारी कामं पाहणं, हा अनुभव खूप शिकवणारा असतो. ऊन-पाऊस यांची पर्वा न करता हे गँगमन ब्लॉक असलेल्या ठिकाणी जातात. मेगा ब्लॉकदरम्यान त्या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद असल्याने ते निर्धास्त असतात. तरीही बाजूच्या मार्गावरून वाहतूक चालू असल्याने त्यांना ती काळजी घ्यावी लागते. गेल्या रविवारी ठाणे-कल्याण यांदरम्यान मेगा ब्लॉक होता. ठाणे-कळवा या स्थानकांदरम्यान कल्याणकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावरील क्रॉसओव्हर पॉइंटवरचे रूळ बदलण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. गँगमनची गँग रूळ बदलण्यासाठी लागणारी छोटी पुली, दोन रूळ एकमेकांना जोडण्यासाठी लागणारी सगळी सामुग्री घेऊन तयार होती. अभियांत्रिकी, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन आणि विद्युत पुरवठा या तीन विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्याशिवाय त्या अधिकाऱ्यांच्या हाताखालचे सेक्शन इंजिनीअर्स हे सगळं काम व्यवस्थित होतंय की नाही, हे पाहत होते. साधारण तास-दीड तासांच्या परिश्रमानंतर जुना रेल्वे ट्रॅक बदलून त्या जागी नवीन रेल्वे ट्रॅक टाकण्यात आला. खराब झालेला जुना रेल्वे ट्रॅक आणि त्यावरच्या लाल खुणा अगदी स्पष्ट दिसत होत्या. रूळ बदलल्यानंतर मग त्या रुळाला खालच्या स्लीपरशी जोडून ठेवणारे क्लॅम्प लावण्यात आले. तो रूळ दुसऱ्या रुळाशी जोडण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी दोन्ही रुळांवर एक छोटं यंत्र ठेवलं. दोन रूळ जोडण्यासाठी मातीच्या कौलांसारखं एक भांडं त्यावर ठेवलं. त्याच्या सर्व बाजूंनी ओली वाळू बसवून ते एकदम बंद केलं. मग अॅल्युमिनिअम पावडर आणि फेरस ऑक्साइडची पावडर एका भांडय़ात टाकली. खालच्या कौलसदृश भांडय़ामध्ये आगीची धग सोडून दोन्ही रूळ तापवले. त्यानंतर ते रूळ तापून लाल झाल्यावर दोन्ही पावडरींचं मिश्रण असलेल्या भांडय़ात जळती फुलबाजी टाकली. हे मिश्रण गरम होऊन वितळलं आणि ते कौलसदृश भांडय़ात झिरपून बरोबर दोन रुळांच्या फटीत जाऊन बसलं. हा प्रकार गार झाल्यावर मग बाकीचा भाग काढून टाकून दोन रूळ सांधलेला भाग नीट तासून एकत्र करण्यात आला.
रूळ बदलणं नाही, तर इतरही कामं खूपच किचकट आहेत. त्यात बाजूच्याच मार्गावरून गाडय़ा जात असतात. त्याचीही काळजी काम करणाऱ्यांना घ्यावी लागते. उन्हाळ्यात रणरणतं ऊन्ह जाळत असतं, तर पावसाळ्यात धो-धो पावसामुळे ट्रॅकवर रबरबाट झाला असतो. तरीही रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी दर रविवारी कोणत्या ना कोणत्या सेक्शनमध्ये मेगा ब्लॉकचं काम करतच असतात.. मुंबईतील ही अत्यंत व्यग्र रेल्वे सेवा अविरत चालू ठेवण्यासाठी!!!
रोहन टिल्लू
twitter@rohantillu
tohan.tillu@expressindia.com