येत्या रविवारीही मध्य व हार्बर मार्गावर महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. येत्या रविवारी पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.

मध्य रेल्वे

कुठे – कल्याण ते ठाणे या स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर.
कधी – सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वा.
परिणाम – कल्याणहून ठाण्याकडे येणाऱ्या सर्व जलद गाडय़ा ब्लॉकच्या काळात अप धीम्या मार्गाने चालवण्यात येतील. या गाडय़ा कल्याण ते ठाणे या दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. तसेच ठाण्यापुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील. मुंबईहून कल्याणकडे येणाऱ्या गाडय़ा आपल्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर या स्थानकांवरही थांबतील. तसेच रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी दिवा स्थानकातच थांबवून ती दादर-रत्नागिरी म्हणून चालवण्यात येणार आहे. ब्लॉकच्या काळात वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू राहील.
मेगाब्लॉकच्या निमित्ताने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी बेस्ट प्रशासन १० मर्या., २० मर्या. आणि ४४ या आपल्या मार्गावर जादा बसगाडय़ा चालवणार आहे.

हार्बर मार्ग
कुठे – कुर्ला ते मशिद या स्थानकांदरम्यान अप मार्गावर आणि वडाळा रोड ते माहीम या स्थानकांदरम्यान अप व डाउन दोन्ही मार्गावर.
कधी – सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वा.
परिणाम – ब्लॉकच्या काळात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वांद्रे-अंधेरी या टप्प्यातील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. तसेच ब्लॉकच्या काळात कुल्र्याहून मुंबईकडे येणाऱ्या गाडय़ा मुख्य मार्गावरून चालवल्या जातील. या गाडय़ा शीव, माटुंगा, दादर आणि परळ या स्थानकांवर थांबतील.