१३ सप्टेंबरला रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन; राजधानी एक्स्प्रेस चार वेळा धावणार
मुंबई : विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रकल्पांची लगबग आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते १३ सप्टेंबरला पश्चिम, मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बरवरील पादचारी पूल, सरकते जिने, वायफाय इत्यादी सुविधांचे उद्घाटन व लोकार्पण केले जाणार आहे. याशिवाय मुंबई ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आठवडय़ातून चार वेळा धावणार असून तिला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. तर सीएसएमटीतील रेल्वे अपघात दावा प्राधिकरणाच्या नवीन इमारतीचाही शुभारंभ होईल.
शुक्रवारी सकाळी १० वाजता सीएसएमटी येथील १८ नंबर फलाटावर होणाऱ्या या कार्यक्रमाला अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यासह अनेक लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी उपस्थित राहतील. लवकरच निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याने रेल्वे सुविधांचे उद्घाटन व लोकार्पण करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाकडून तातडीने मुंबई ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या फे ऱ्या वाढवण्यासंदर्भात लागणारी अधिसूचनाही काढली. यापुढे बुधवार आणि शनिवारीबरोबरच ही गाडी सोमवार व शुक्रवारीदेखील धावणार आहे. त्यासाठीची अधिसूचना काढण्यासाठी रेल्वे मंत्रालय व मध्य रेल्वेकडून बरीच धडपड करण्यात आली.
सध्या मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर होणारे अपघात आणि अपघातग्रस्त किंवा त्यांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाईसाठी होणारा विलंब पाहता आणखी एक रेल्वे दावा लवादाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सीएसएमटी येथे नवीन इमारतीत दुसरे खंडपीठ बसणार असून त्याचे उद्घाटन रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार आहे. याशिवाय खार रोड आणि विलेपार्ले स्थानकात पादचारी पूल, लोअर परळ स्थानकात सरकत्या जिन्यांचेही उद्घाटन होणार आहे.
प्रवाशांच्या सेवेत आलेल्या सुविधांचेही लोकार्पण : जीटीबी नगर, कळवा, दिवा, उंबरमाळी, शहाड, कुर्ला, विद्याविहार, लोअर परळ, मरिन लाइन्स, प्रभादेवी स्थानकात पादचारी पूल, परळ स्थानकातील सरकता जिना व लिफ्ट, सीएसएमटी स्थानकातील १४ ते १८ नंबर फलाटावर प्रवाशांसाठी स्वतंत्र नवीन मार्गिका, घाटकोपर व गोवंडी स्थानकातील तिकीट कार्यालयाचे नूतनीकरण, शिवडी, जीटीबी नगर, डॉकयार्ड रोड, सॅण्डहर्स्ट रोड, आंबिवली, टिटवाळा, चुनाभट्टी, किंग्ज सर्कल, भांडुप, कांजूरमार्ग, महालक्ष्मी, प्रभादेवी, लोअर परळ, माटुंगा रोड, माहीम अशा एकूण २९ स्थानकांत वायफाय सुविधा, सीएसएमटी, चिंचपोकळी, करी रोड, जीटीबी, सायन, चुनाभट्टी यासह एकूण ९ स्थानकांत फलाटांवर नवीन छप्पर, २२ स्थानकांत एलईडी इंडिकेटर.
एसटी सुविधांच्या उद्घाटने : आचारसंहितेच्या काळात नवीन सुविधा व प्रकल्प थांबू नये यासाठी एसटीकडूनही उद्घाटनाची लगबगआहे. दोन दिवसांत दहापेक्षा जास्त नवीन बस स्थानक व त्यांच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन केले जाणार आहे. याआधीच शिवाई नावाने विद्युत बस, विद्याविहार येथे एसटी कर्मचाऱ्यांसाठी सेवा निवासस्थाने, अत्याधुनिक शाळा, मुंबई सेन्ट्रल येथे एसटीची ४९ मजली इमारतीचा भूमिपूजन सोहळाही ५ सप्टेंबर रोजी पार पडला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 12, 2019 4:37 am