केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी कोकण रेल्वेच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण अशी घोषणा केली. या घोषणेनुसार केंद्र सरकारने कोकण रेल्वेच्या विकासासाठी ४ हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे दुर्गम भागातून धावणारी कोकण रेल्वे कात टाकणार आहे. केंद्राने मंजूर केलेल्या निधीतून संपूर्ण कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण होणार आहे. याशिवाय , रोहा-वीर मार्गाचे दुपदरीकरण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा चिपळूण-कराड हा नवा रेल्वेमार्ग उभारण्याचाही या विकासकामांमध्ये समावेश आहे. तसेच आगामी काळात कोकण रेल्वेमार्गावर ११ नवीन स्थानक उभारण्यात येणार असल्याची माहितीही सुरेश प्रभू यांनी दिली.

कोकण रेल्वेला दिलेला निधी मागील काही वर्षापासून खर्च झाला नव्हता. परंतु आता कोकण रेल्वेसाठी तरतूद करण्यात आलेल्या १० हजार कोटींपैकी चार हजार कोटींच्या कामांना रेल्वेमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.

दरम्यान,  कोकण रेल्वेमार्गावरील दिवा-रोहा या स्थानकांदरम्यानचे दुपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून २० मार्च रोजी पूर्ण होणार आहे. त्यानंतरच्या आठवडाभरात रेल्वे सुरक्षा आयुक्त या कामाची पाहणी करणार असून २८ मार्चपासून दिवा-रोहा या पट्टय़ात गाडय़ा दोन मार्गावरून धावू लागतील. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाडय़ांना होणारा विलंब काही प्रमाणात टळणार आहे. या १०१ किमीच्या मार्गावरील नागोठणे ते रोहा या १३ किलोमीटरच्या टप्प्याचे काम शिल्लक होते. हे काम २० मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. मध्य रेल्वेच्या दिवा-रोहा या दरम्यानचा १०१ किमीचा मार्ग एकेरी होता. कोकण मार्गावर जाणाऱ्या गाडय़ा मध्य आणि कोकण रेल्वे अशा दोन रेल्वेच्या हद्दीतून जातात. त्यापकी कोकण रेल्वेच्या हद्दीत दुपदरीकरणाचे काम नुकतेच सुरू झाले आहे. पण दिवा-रोहा या १०१ किमीदरम्यानचे दुपदरीकरणाचे काम मध्य रेल्वेने वेगाने केले आहे. पनवेल-पेण आणि पेण-रोहा अशा दोन टप्प्यात हे काम करण्यात आले असून त्यासाठी अनुक्रमे २७० कोटी आणि ३७० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला. पेण-रोहा या दुसऱ्या टप्प्यात नागोठणे ते रोहा या १३ किलोमीटरच्या अंतरात रेल्वे हद्दीत काही बांधकामे होती. ती हटवण्यासाठी रेल्वेला न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागल्याने हा प्रकल्प रखडला होता.