News Flash

डय़ुटी संपताच रेल्वेगाडी सोडून ड्रायव्हर घरी..

* मुंबई-सावंतवाडी गाडीच्या प्रवाशांचे हाल * दीड तास उक्शी स्थानकात ‘रखडपट्टी’ रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांचे मोटरमननी ‘नियमानुसार काम’चे कारण पुढे करत लोकल चालवण्यास नकार दिल्यामुळे वाहतूक खोळंबल्याच्या घटना

| April 3, 2013 04:46 am

* मुंबई-सावंतवाडी गाडीच्या प्रवाशांचे हाल
* दीड तास उक्शी स्थानकात ‘रखडपट्टी’
रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांचे मोटरमननी ‘नियमानुसार काम’चे कारण पुढे करत लोकल चालवण्यास नकार दिल्यामुळे वाहतूक खोळंबल्याच्या घटना अनेकदा उजेडात आल्या आहेत. पण मंगळवारी कोकण रेल्वेच्या गाडीतील प्रवाशांना अशाच कारणांमुळे तब्बल दीड तास रखडून बसावे लागले. ‘माझी वेळ संपली आहे, मी पुढे गाडी नेणार नाही,’ ड्रायव्हरने गाडी चालवण्यास नकार दिल्याने मुंबई-सावंतवाडी गाडी मंगळवारी सकाळी रत्नागिरीजवळील उक्शी स्थानकात अडकून पडली. दोन तासानंतर दुसरा लोको पायलट आल्यानंतर ही गाडी पुढे सरकली.
लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी ही विशेष गाडी सोमवारी मध्यरात्री १२.५५ वाजता सावंतवाडीकडे रवाना झाली. सकाळी आठ वाजता ही गाडी रत्नागिरी स्थानकात पोहोचणे आवश्यक होते. पण रत्नागिरीच्या आधी असलेल्या उक्शी स्थानकात ही गाडी साडेनऊच्या सुमारास आली आणि तेथेच ती थांबून राहिली. प्रवाशांनी गाडीचे लोको पायलट जे. व्ही. दळवी यांच्याकडे विचारणा केली असता, ‘माझी डय़ुटी संपली असल्याने मी गाडी पुढे नेत नाही’, असे उत्तर त्यांनी दिले. प्रवाशांनी उक्शी स्थानकाच्या प्रमुखांकडे धाव घेतली असता दळवी यांनी ‘अवर्स ऑफ एम्प्लॉइज’ नियमावलीवर बोट दाखवले. आपली १० तासांची डय़ुटी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी स्थानकप्रमुखांना सांगितल्यामुळे त्यांनाही काही करता येत नव्हते. त्यामुळे तब्बल दीड तास ही गाडी उक्शी स्थानकात उभी होती.
प्रवाशांनी मागून येणाऱ्या गाडीने आपला प्रवास पुढे सुरू करावा, अशी विनंती स्थानकप्रमुखांनी केली. मात्र येणाऱ्या गाडीला नियमित थांबा नसल्याने आणि एका गाडीतील प्रवाशांना दुसऱ्या गाडीत अवघ्या एक मिनिटात सामानासह चढविणे शक्य नसल्याने हा पर्याय रद्द करण्यात आला. एस २ या बोगीतून प्रवास करत असलेल्या मंजुळा इरीशेट्टी यांनी ‘लोकसत्ता’शी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सिद्धेश्वर तेलुगु यांना या घटनेची माहिती दिल्यावर त्यांनी संबंधित स्थानकप्रमुखाशी चर्चा केली. त्यानंतर अध्र्या तासाने रत्नागिरीहून कोकण रेल्वेचा लोको पायलट पाठवण्यात आला व गाडी पुढे रवाना झाली. लोको पायलट दळवी यांनी किमान रत्नागिरीपर्यंत गाडी नेणे आवश्यक होते. मात्र त्यांनी तसे न करता वाटेतच नियमांवर बोट ठेवून प्रवाशांची गैरसोय केल्याबद्दल तेलुगु यांनीही नाराजी व्यक्त केली. दळवी यांची डय़ुटी नेमकी किती वाजता सुरू झाली आणि त्यांनी नियमांवर बोट ठेवून अशी प्रवाशांची अडवणूक कोणत्या कारणास्तव केली, याची विचारणा कोकण रेल्वे मध्य रेल्वेकडे करणार असल्याचे तेलुगु यांनी सांगितले.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 4:46 am

Web Title: railway motorman drop the driving in halfway because of his duty time ends
टॅग : Kokan Railway
Next Stories
1 अनधिकृत बांधकाम नियमित करण्याबाबतचा निर्णय पावसाळ्यापूर्वी
2 गडकरी-मुंडे वादात तावडेंच्या पोळीवर प्रदेशाध्यक्षपदाचे ‘तूप’?
3 ‘आदिवासी विभाग ठेकेदारांच्या हातचे कळसूत्री बाहुले’
Just Now!
X