लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे भाडे वाढल्यानंतर भाडय़ातील फरक वसूल करण्यासाठी मध्य रेल्वेने सर्व टर्मिनल्सवर विशेष खिडक्या उघडण्याचा निर्णय घेतला आहे. २२ जानेवारीपूर्वी या खिडक्या उघडण्यात येणार असून प्रवाशांना रेल्वे प्रवासात तिकीट तपासनीसांकडे हा फरक भरण्याऐवजी रेल्वे स्थानकातच असलेल्या या खिडक्यांवर ही रक्कम भरण्याची सोय करण्यात आली आहे.
तिकिटामधील फरक २२ जानेवारीपासून लागू होणार आहे. रेल्वे प्रशासन नेहमी भाडेवाढनंतर ही फरक गाडीमध्येच तिकीट तपासनीसांमार्फत वसूल करते. मात्र आता प्रवासापूर्वीच तिकिटातील फरक भरून प्रवाशांना नवे तिकीट घेता यावे, यासाठी टर्मिनसवर विशेष खिडक्या उघडण्यात येणार असल्याचे मुख्य जनसंपर्काधिकारी विद्याधर मालेगावकर यांनी सांगितले.