मध्य रेल्वेकडे ट्विटरवरून तक्रारींचा पाऊस; अनधिकृत फेरीवाल्यांबाबतही नाराजी
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटर हे माध्यम सर्रास वापरायला सुरुवात केल्यानंतर रेल्वेचे अधिकारीही १४० कॅरेक्टर्सच्या या माध्यमावर आपले अस्तित्त्व दाखवू लागले आहेत. विशेष म्हणजे यात प्रवासीही मागे नसून याआधी केवळ स्टेशन अधीक्षकाकडे किंवा तिकीट निरीक्षकाकडे असलेल्या तक्रार पुस्तकात तक्रार नोंदवून विसरून जाणाऱ्या प्रवाशांनी या माध्यमाचा वापर तक्रारीसाठी करण्यास सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेवर ट्विटरच्या माध्यमातूनच येणाऱ्या तक्रारींचा पाऊस एप्रिल महिन्यात पडला. या एका महिन्यात दाखल झालेल्या तक्रारींची संख्या ३०० टक्के एवढी प्रचंड होती. या तक्रारींमध्ये लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधील वातानुकुलन यंत्रणा बंद असल्याच्या किंवा चालत नसल्याच्या तक्रारींचाही समावेश असून सर्वाधिक तक्रारी फेरीवाल्यांबाबत प्राप्त झाल्या आहेत.
उन्हाळ्याच्या काळात लांब पल्ल्याच्या वातानुकुलित गाडय़ांची संख्या मागणीपेक्षा कमी असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी ट्विटरच्या माध्यमातून केल्या आहेत. असलेल्या गाडय़ांच्या डब्यांमधील वातानुकुलन यंत्रणा सदोष असल्याचेही अनेकांनी नोंदवले आहे. एप्रिल महिन्यात केवळ ट्विटरवरून २१८ तक्रारी दाखल झाल्या. त्यात या वातानुकुलित डब्यांबाबतच्या तक्रारींचाही समावेश आहे. वातानुकुलित यंत्रणा सदोष नसून प्रवाशांची संख्या जास्त असल्याने अनेकदा ही यंत्रणा पुरेशी पडत नसल्याचे रेल्वेचे अधिकारी स्पष्ट करत आहेत.
त्याचप्रमाणे या २१८ तक्रारींपैकी सर्वाधिक म्हणजे ६० तक्रारी फेरीवाल्यांबाबत आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणाऱ्या गाडय़ांमध्ये आणि कल्याण स्थानकापुढे लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये फेरीवाल्यांचे प्रमाण जास्त असते, असे या तक्रारींमार्फत कळते. तसेच ५६ तक्रारी स्वच्छतेबाबतही करण्यात आल्या. यात बायो टॉयलेट्सचा दुरुपयोग करण्याबाबतच्या, डब्यांमध्ये कचरा करून घाण करण्याच्या तक्रारींचा समावेश आहे. स्वच्छतेबाबतच्या या गोष्टींचा विपरित परिणाम स्वच्छता राखणाऱ्या यंत्रणांवर होत असल्याचेही अधिकारी सांगतात.