१२ डब्यांच्या मोजक्या सेवांमुळे हार्बरवर गोंधळ
मुंबईहून पनवलेकडे जाणारी गाडी पकडण्यासाठी लोक सँडर्स्टरोड स्थानकात उभे असतात.. गाडी स्थानकात शिरताना दिसते आणि पनवेल दिशेकडे उभे असलेले प्रवासी गाडी पकडण्यासाठी पुढे सरसावतात.. गाडी नेहमीच्या ठिकाणी न थांबता पुढे जाते आणि या सर्वच प्रवाशांची धावपळ सुरू होते.. २९ एप्रिलपासून हार्बर मार्गावर विविध स्थानकांत प्रवाशांना हा अनुभव घ्यावा लागत आहे. हार्बर मार्गावर १२ डब्यांची एक गाडी धावायला लागली असली, तरी त्या गाडीच्या सेवेबद्दल उद्घोषणा करणारे उद्घोषक रेल्वेच्या काही स्थानकांवर नसल्याने हे प्रकार घडतात.
हार्बर मार्गावर १२ डब्यांची पहिली गाडी धावण्यास सुरुवात झाली असून ही गाडी दिवसातून १४ सेवा चालवते. मात्र या १४ सेवांव्यतिरिक्त हार्बर मार्गावरील सर्व सेवा अद्याप नऊ डब्यांच्याच आहेत. त्यामुळे या गाडीच्या १४ सेवांच्या वेळी प्रत्येक स्थानकात पुढील गाडी ९ ऐवजी १२ डब्यांची आहे, अशी उद्घोषणा करणे आवश्यक आहे.

उद्घोषक नेमण्याची प्रक्रिया सुरू
ही समस्या रेल्वेने विचारात घेतल्याचे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले. जवळपास सर्वच स्थानकांवर उद्घोषक आहेत. मात्र, काही स्थानकांवर उद्घोषक नेमण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ती पूर्ण होईल, असे ते म्हणाले.