पाच महिन्यांत २२४ प्रवाशांकडून पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडे बॅग विसरल्याच्या तक्रारी

गर्दीच्या वेळी रेल्वे गाडीच्या डब्यातून गडबडीत बाहेर पडताच, आई शप्पथ..बॅग गाडीतच राहिली, असे म्हणून कपाळावर हात मारणाऱ्या प्रवाशांची संख्या सध्या वाढताना दिसते आहे. गेल्या पाच महिन्यांत तब्बल २२४ प्रवाशांकडून अशाच बॅग विसरण्याच्या तक्रारी पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडे नोंदवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे ५० टक्क्य़ांनी वाढले आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर रेल्वे प्रवासादरम्यान गेल्या अडीच वर्षांत लॅपटॉप, कॅमेरा, सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि भ्रमणध्वनी विसरल्याच्या सुमारे ३५३ घटना घडल्या आहेत. यात प्रवाशांना ९६ लाख ६४ हजार ७२३ रुपये किमतीच्या मौल्यवान वस्तू परत करण्यात आल्या आहेत.

२०१४ साली ३०, २०१५ साली ९९ तर २०१६ मे महिन्यापर्यंत २२४ बॅगा विसरल्याच्या तक्रारीं प्रवाशांनी नोंदवल्या आहेत. केवळ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून प्रवाशांना वस्तू परत मिळणार नाहीत. त्यांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाचे आयुक्त आंनद झा यांनी केले.

रेल्वे सुरक्षा दलातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकेडवारीत अनेक प्रकरणांत कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यात पुरुष प्रवाशांनी महिलांच्या डब्यातून प्रवास केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

  • प्रवाशांनी मदतीसाठी रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधल्याने या वस्तू परत मिळाल्याचे सांगण्यात आले. मात्र लोकल गाडीत विसरलेल्या वस्तू परत मिळणार नाहीत, या विचाराने अनेक प्रवासी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची तसदी घेत नाहीत, असे उघडकीस आले आहे.