लोकल तिकीट, पास एकाच तिकीट खिडकीवर; ओळखपत्र, थर्मल स्क्रीनिंगमुळे विलंब

मुंबई : तिकीट, नवा पास किं वा नूतनीकरणाकरिता बहुतांश स्थानकांवर मर्यादित खिडक्याच कार्यरत असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी लोकल प्रवासाचा दुसरा दिवस रांगेत तासन्तास तिष्ठत उभे राहून काढला. तिकीट मिळविण्याचे दिव्य पार पाडल्यानंतरही पुढे ओळखपत्र तपासणी आणि थर्मल स्क्रीनिंगमुळे लोकल गाठण्यात विलंब होत होता. मधल्या स्थानकांवर गाडय़ा थांबत नसल्यानेही अनेक प्रवाशांचे हाल होत आहेत.

सोमवारपासून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे उपनगरीय लोकल सेवेत आली. मात्र रेल्वे व राज्य सरकारकडून माहिती उपलब्ध करण्यास लागलेल्या विलंबामुळे सकाळी गर्दीच्या वेळी बहुतांश लोकल रिकाम्याच धावल्या. मंगळवारी मात्र सकाळपासून रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या तिकिटासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी सात वाजल्यापासून मध्य रेल्वेवरील ठाणे, मुलुंड, कल्याण, डोंबिवली, कु र्ला, घाटकोपर, दादर याशिवाय पश्चिम रेल्वेवरील दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली यांसह अन्य काही स्थानकांत तिकिटाच्या रांगा लागल्याचे चित्र होते. काही स्थानकांत सकाळी गर्दीच्या वेळी दोनच तिकीट खिडक्या सुरू होत्या. प्रवाशांच्या रांगा पाहून एखाददुसरी तिकीट खिडकी सुरू के ली जात होती. मात्र एकाच खिडकीवर कर्मचाऱ्याच्या ओळखपत्रावर नवीन पास, पासाचे नूतनीकरण आणि तिकीटही दिले जात होते. एकाच तिकीट खिडकीवर अनेक कामे होत असल्याने रांगा वाढतच होत्या. काही प्रवाशांनी रांगेत एक ते सव्वा सात उभे राहावे लागल्याची तक्रार केली. त्यामुळे कार्यालयाची वेळ चुकणार की काय, अशी भीती अनेकांना होती.

मी कळव्याला राहतो. येथील स्थानकावर लोकल थांबत नाही. त्यामुळे लोकल पकडण्यासाठी रिक्षा किं वा बसने ठाणे स्थानकात यावे लागले. परंतु त्याआधी तिकिटाच्या भल्यामोठय़ा रांगेत उभे राहावे लागले. तिकीट मिळवण्यासाठी एक तास लागला. एकाच तिकीट खिडकीवर पास, तिकीट उपलब्ध के ले जात आहे. त्यामुळे विलंब होत आहे.

– राजेश मुरुडकर, बीपीटी कर्मचारी

लोकल नसल्याने ठाण्यातून दुचाकीवरून रुग्णालय गाठावे लागत होते. आता लोकलने झटपट प्रवास होईल, परंतु त्याआधी तिकिटांच्या रांगेतच वेळ गेला. पाऊण तास लागला.

– खंडेराव सोनकांबळे, लिपिक, कस्तुरबा रुग्णालय,

लोकलने जाणाऱ्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळेच तिकीट खिडक्यांची संख्या कमी ठेवण्यात आली आहे. तरीही काही गैरसोय होत असल्यास त्या दूर के ल्या जातील. 

– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

परतीच्या प्रवासालाही विलंब

परतीच्या प्रवासातही प्रवाशांना रांगा चुकल्या नाहीत. स्थानकात प्रवेश करण्याआधी पोलीस व तिकीट तपासनीसांकडून ओळखपत्र, तिकीट व पास तपासल्यानंतर थर्मल स्क्रीनिंगही के ले जात असल्याने सीएसएमटी, चर्चगेट यांसह अन्य गर्दीच्या स्थानकाबाहेर सायंकाळी पाचनंतर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. सीएसएमटीत जीपीओकडील दिशेने प्रवेश दिला जात होता. इथल्या रांगा बेस्ट आगारापर्यंत गेल्या होत्या.

एटीव्हीएम बंदच

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रावर तिकीट व पास दिले जात आहे. मात्र कमी तिकीट खिडक्यांमुळे रांगा वाढत आहेत.  बंद असलेल्या एटीव्हीएमवर तरी मदतनीस देऊन ओळखपत्रावर तिकीट देण्याची मागणीही प्रवासी करत आहेत.

सामाजिक अंतरासाठी खुणा

लोकलची प्रतीक्षा करण्यासाठी फलाटावर उभे राहताना प्रवाशांना सामाजिक अंतर ठेवावे यासाठी खुणा करण्यात येत आहेत. सीएसएमटी, चर्चगेटसह अन्य काही स्थानकात खुणा केल्या असल्याचे मध्य व पश्चिम रेल्वेने सांगितले.

सामाजिक अंतराचे तीनतेरा

करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्क आणि सामाजिक अंतर पाळण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. मात्र मर्यादित तिकीट खिडक्या, तिकीट आणि पास देण्यास होणारा विलंब यामुळे रांगा लांबत होत्या. परिणामी, सामाजिक अंतर पाळले जात नव्हते.