स्थानकातील वाढत्या गर्दीमुळे पायाभूत सुविधांवर ताण

दादरच्या पुढील स्थानक, रेल्वेचा कारखाना, पश्चिम आणि मध्य या दोन्ही मार्गावर जाण्याची मुभा यांमुळे महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या परळ स्थानकाचे रूपांतर टर्मिनस स्थानकात होत असताना गेल्या तीन वर्षांमध्ये येथील प्रवासी संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. याच कालावधीत शीव स्थानकातील प्रवासी संख्या वाढली असून येत्या काळात या स्थानकातील पायाभूत सुविधा या वाढत्या प्रवासी संख्येसाठी अपुऱ्या ठरणार आहेत. पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामात या स्थानकाचा विस्तार होणार असला तरी वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयांची वाढती संख्या लक्षात घेता या स्थानकातूनही लोकल सोडण्याची मागणी भविष्यात जोर धरण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेच्या स्थानकनिहाय प्रवासी संख्येची आकडेवारी (पाहा तक्ता) पाहिल्यास, परळ स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होत असून शीव स्थानकातील गर्दी वाढत असल्याचे दिसून येते. शीव स्थानकापासून वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, धारावी, अँटॉप हिल आदी भाग जवळ असून वांद्रे-कुर्ला संकुलात अनेक सरकारी कार्यालयांपासून आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयांपर्यंत व्यवसायवृद्धी होत आहे. भविष्यातही या संकुलात अनेक नवीन उद्योगधंदे येणार असून त्यामुळे येथे रोजगाराच्या संधीही जास्त असतील. वांद्रे-कुर्ला संकुलात जाण्यासाठी कुल्र्याऐवजी शीव स्थानक अधिक जवळ असल्याने आणि येथून बस व रिक्षा सहज उपलब्ध होत असल्याने प्रवासी शीव स्थानकाला पसंती देत आहेत. या गोष्टी लक्षात घेता भविष्यात शीव स्थानकावरील भार वाढणार असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

mv01

पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पात शीव स्थानकाचा कायापालट होणार असून या स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या संख्येत दोनने भर पडणार आहे. पण तूर्तास शीव स्थानकात जलद गाडय़ा थांबवण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन नसल्याने या अतिरिक्त प्लॅटफॉर्मचा फायदा होणार नाही.

याबाबत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्याला विचारले असता, ही प्रवासी संख्या स्थानकातून तिकीट घेणाऱ्या प्रवाशांची आहे. प्रत्यक्षातील प्रवासी संख्या जास्त असू शकते, असे त्याने सांगितले.