पोलिसांकडून दोघांना अटक;  विविध मार्गानी प्रवाशांची नेहमीच लूट

रिक्षा-टॅक्सीचालक सामान्यांना नाडण्यासाठी सतत नवनवे मार्ग शोधत असतात. पण, लांब पल्ल्याच्या गाडय़ा पकडण्याच्या धडपडीत असणाऱ्या प्रवाशांकडून ‘फाटक चार्ज’च्या नावाखाली तब्बल २०० रुपये वसूल करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुर्ला रेल्वे स्थानकातून लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जात असताना हा प्रकार सर्रास घडत असून प्रवाशांना नाडण्याचे अनेक प्रकारही उघडकीस येत आहेत, मात्र तक्रार करण्यासाठी कोणीही नागरिक पुढे येत नसल्याने पोलिसांना गस्तीमध्ये वाढ करावी लागली आहे.

हार्बर मार्गावरील टिळकनगर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून उत्तर भारतात मोठय़ा प्रमाणावर गाडय़ा जातात. टर्मिनसला जाण्यासाठी अनेक प्रवासी कुर्ला स्थानकात उतरुन रिक्षा पकडून जातात. पण, रात्री १२ वाजल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारची मुजोरी इथे सुरु असल्याची उघडकीस आली आहे. ग्रँटरोड येथे राहणारे ४९ वर्षीय मोहम्मद गुलाम हुसेन शेख उत्तर प्रदेशात आपल्या गावी निघाले होते. कुल्र्याहून रिक्षा पकडल्यानंतर फाटकाजवळ आल्यानंतर त्यांची रिक्षा थांबली. रिक्षाचालकाने प्रवाशांना प्रत्येकी २०० रुपये काढण्यास सांगितले. मोहम्मद यांनी याचे कारण विचारले असता, रिक्षाचालकाने फाटकाजवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखवून ती व्यक्ती रेल्वेची अधिकारी असून रात्री फाटक बंद केले जाते. मात्र, त्यांना फाटक चार्ज देत असल्यानेच हे फाटक खुले ठेवले जाते, असे सांगितले. रिक्षातील इतर प्रवाशांनी पैसे काढून रिक्षाचालकाला दिले मोहम्मद यांनी मात्र, त्याला विरोध केला. बाचाबाची झाल्यानंतर फाटकावर उभी असलेली ती व्यक्ती रिक्षाजवळ आली. रिक्षाचालकाने फाटक चार्ज देण्यास नकार देत असल्याचे सांगितले. हे ऐकून या व्यक्तीने मोहम्मद यांना रिक्षातून उतरवत मारहाण केली.

मोहम्मद यांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात धाव घेत याची तक्रार दाखल केली. उपनिरीक्षक घनश्याम बोरसे यांच्यासह हवालदार राखुंडे, घाडगे यांनी तपास करत रिक्षाचालक सर्फराज शेख (२५) आणि फाटकावर रेल्वे अधिकारी असल्याचे भासवत उभा असलेल्या राजेश सुरवाडे याला अटक केली.

कुर्ला ते टिळक टर्मिनस दरम्यान फसवणुकीचे असे प्रकार सातत्याने वाढत असून त्यावर चाप लावण्यासाठी नेहरूनगर पोलिसांनी गस्तीमध्ये वाढ केली आहे.

एक का बीस

आणखी एका फसवणूकीच्या प्रकारात, रिक्षाचालक कुल्र्याला प्रवाशांना बोलवताना ‘एक का बीस’, अशापध्दतीने बोलवतात. टिळक टर्मिनस येथे पोहोचल्यावर प्रत्येकाकडून १२० रुपयांची मागणी करण्यात येते. यावर प्रत्येकी २० रुपये बोलून १२० रुपये कसे मागता असा प्रश्न केल्यावर ‘एका का बीस’ नव्हे तर ‘एक सौ बीस’ असे आधीच सांगितले होते, असे सांगून रिक्षाचालकांकडून दादागिरी करण्यात येते. मात्र, ट्रेन पकडण्याच्या गडबडीत असलेले प्रवासी पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी जात नसल्याने या रिक्षाचालकांवर कारवाई होत नसल्याचे प्रवासी सांगतात. रिक्षातून उतरताना प्रवाशांकडील सामान वाहण्यासाठी येणाऱ्या हमालांकडून अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी होते आणि ती मंजूर केली नाही तर सामानच गायब करण्याच्या धमक्याही दिल्या जाते, असेही प्रवाशांचे म्हणणे आहे.

गस्तवाहन आले की मुजोरी बंद

फाटक चार्ज आकारण्याची घटना घडल्यापासून पोलिसांनी या ठिकाणी गस्तीमध्ये वाढ केली आहे. मात्र, पोलिसांचे गस्तवाहन आल्यानंतर सर्व प्रकार बंद होतो, गस्तपथक  गेल्यानंतर पुन्हा हा प्रकार सुरु असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.