खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी टॅक्सी चालकाची गैरवर्तणूक

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी दादर स्थानकात टॅक्सी चालकाने गैरवर्तन केले होते. त्याविरोधात रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर मध्य रेल्वे सुरक्षा दलाने पाच स्थानकांत घुसखोरी करून प्रवाशांशी गैरवर्तणूक करणाऱ्या टॅक्सी-रिक्षा चालकांची धरपकड करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

१२ सप्टेंबर रोजी सुप्रिया सुळे या औरंगाबादहून मध्य रेल्वेवरील दादर स्थानकात एक्स्प्रेसमधून उतरत असतानाच कुलजित सिंग मल्होत्रा नावाचा एक व्यक्ती ट्रेनमध्येच येऊन टॅक्सीसाठी विचारू लागला. त्याला दोनदा नकार दिल्यानंतरही तो त्रास देऊ लागला आणि त्याने फोटोही काढले. सुळे यांनी घडलेला सर्व प्रकार ट्विटरद्वारे रेल्वेमंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिला व या प्रकारात रेल्वेमंत्रालयाने लक्ष घालण्याची मागणी केली. टॅक्सी चालकांना रेल्वे स्थानक, विमानतळ या ठिकाणी परवानगी न देता फक्त ठरावीक रिक्षा-टॅक्सी तळावरच परवानगी देण्याची सूचनाही केली. तसेच याविरोधात रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली.

त्यानंतर मध्य रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे स्थानकात अनधिकृतपणे येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला. १३  ते २० सप्टेंबपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के.के. अशरफ यांनी सांगितले.

सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे कल्याण स्थानकात ही मोहीम घेण्यात आली असून यात दंड किंवा शिक्षा होऊ शकते. दरम्यान, सुळे यांच्याशी गैरवर्तवणूक करणाऱ्या चालकाला जामीन मिळाला आहे. त्याला पुन्हा सोमवारी रेल्वे न्यायालयात हजर राहण्यास सांगितल्याचे अशरफ म्हणाले.