मुंबई सेंट्रल स्थानकातील विषारी रसायन फवारणी प्रकरण; नागपाडा पोलिसांकडून चौकशी
मुंबई सेंट्रल स्थानकातील आरक्षण केंद्रात विषारी रसायन फवारणी प्रकरणातील गूढ वाढले आहे. रेल्वे पोलिसांनी ज्याला ताब्यात घेऊन नागपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले, तो तरुण आपण फक्त आरक्षण केंद्रातील गोंधळ पाहण्यासाठी तेथे गेलो होतो, असे सांगत आहे. तसेच त्याच्याकडे कोणतेही संशयास्पद विषारी द्रव्य वा रसायन सापडलेले नाही. न्यायालयानेही त्याला जामीन मंजूर केला आहे.
मुंबई सेंट्रल स्थानकात बुधवारी विषारी रसायन फवारण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी दीपक पांडे या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले व नंतर त्याला नागपाडा पोलिसांच्या हवाली केले. नागपाडा पोलिसांनी पांडेची चौकशी केली असता त्याच्यावर याआधीही दोन गुन्हे दाखल असल्याचे समजले. त्यामुळे त्याच्यावरील संशय बळावला. मात्र, अधिक चौकशी केली असता पांडे रेल्वेस्थानकावर केवळ तिकीट काढण्यासाठी आला होता, असे समजले. आरक्षण केंद्रातील गोंधळ पाहून नेमका काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी आपण तेथे गेलो व रेल्वे पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याचे पांडे याने चौकशीत सांगितले. दरम्यान, सीसीटीव्ही चित्रिकरणातही पांडे विषारी रसायन फवारत असल्याचे कुठेही दिसत नाही. तसेच रेल्वे पोलिसांनी पांडेला नागपाडा पोलिसांच्या हवाली केले त्यावेळीही त्याच्याकडे आक्षेपार्ह असे काहीही आढळले नाही. त्यामुळे पांडेला ताब्यात घेणाऱ्या रेल्वे पोलिसांच्या दोन जवानांनाच चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी सांगितले. पूर्ण स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रिकरणाचीही पाहणी आम्ही करत असून त्यातून काही हाती लागते का, हे तपासण्यात येत असल्याचे कदम म्हणाले. पांडेने विषारी रसायन त्याची पुडी किंवा स्प्रे फेकून दिल्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे ते म्हणाले. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या सदोष कारवाईमुळे या प्रकरणाचा उलगडा होण्यासाठी काही काळ जाण्याची शक्यता आहे.न्यायालयानेही पांडेला जामीन मंजूर केला असून त्याला दररोज पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास फर्मावले आहे.

आणखी एकाला अटक
विषारी रसायन फवारणी प्रकरणी नागपाडा पोलिसांनी आणखी एकाला अटक केली असून सर्फराज शेख (३२) असे या व्यक्तीचे नाव आहे. सर्फराज दीपक पांडेचा साथीदार असल्याचे समजते. विषारी रसायन फवारल्यानंतर प्रवासी बॅगा सोडून पळून जातील आणि आपण चोरी करु शकू, असा विचार करून हा प्रकार दोघांनी केल्याचे समजते.