News Flash

फेरीवाल्यांच्या मुजोरीला कलम ‘१४४’चे कवच

दहिसर स्थानकात असलेल्या सब-वेमध्ये फेरीवाले नेहमीच ठाण मांडून बसलेले असतात.

रेल्वे कायद्यातील तरतुदींमुळे केवळ दंडात्मक कारवाई; अरेरावीचा रेल्वे प्रवाशांना फटका

रेल्वे परिसरात, स्थानकांवर, पादचारी पुलांवर बिनदिक्कत आपल्या पथाऱ्या पसरून व्यवसाय करणाऱ्या आणि प्रवाशांशी अरेरावीचे वर्तन करणाऱ्या फेरीवाल्यांना दंड आकारण्याशिवाय त्यांच्याविरोधात इतर कोणतीही कारवाई करण्यास रेल्वे सुरक्षा दल असमर्थ आहे. फेरीवाल्यांना हे ‘संरक्षण’ रेल्वे कायद्यातील १४४व्या कलमानुसारच मिळाले असून या कलमानुसार फेरीवाल्यांकडून फक्त दंड वसूल करण्याशिवाय त्यांच्यावर अन्य कोणतीही कारवाई करता येणार नसल्याचे रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारीच सांगत आहेत. विशेष म्हणजे या फेरीवाल्यांनी प्रवाशांना धमकावले, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही.

कोणत्याही उपनगरीय रेल्वे स्थानक परिसराप्रमाणे दहिसर स्थानकात असलेल्या सब-वेमध्ये फेरीवाले नेहमीच ठाण मांडून बसलेले असतात. रेल्वे हद्दीत व्यवसाय करणाऱ्या या अनधिकृत फेरीवाल्यांचे वृत्तांकन करण्यासाठी एका वर्तमानपत्राचा बातमीदार गेला असता फेरीवाल्यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रकार बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास घडला. या बातमीदारासह एकाच गाडीत चढत दोन फेरीवाल्यांनी या बातमीदाराला स्पष्ट शब्दांत धमकावले.

याबाबत पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आलोक शुक्ला यांना सूचित केले असता त्यांनी या फेरीवाल्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्याबाबत असमर्थता दर्शवली. तसेच ‘तुम्ही रेल्वे कायद्यातील १४४व्या कलमात संसदेत जाऊन बदल करा, मगच कारवाई होऊ शकेल,’ असा तिरपागडा सल्ला देत वाटेला लावले.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पाटलीपुत्र एक्स्प्रेसवरील दरोडा कल्याण स्थानकातील फेरीवाल्यांनी टाकल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर दिवसेंदिवस जवळपास प्रत्येक स्थानकांमध्ये हातपाय पसरणाऱ्या फेरीवाल्यांच्या मुजोरीला प्रवाशांनाही तोंड द्यावे लागत आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी तेवढय़ापुरती दंडात्मक कारवाई करून या फेरीवाल्यांकडून दंड उकळतात, पण त्यांची पाठ फिरल्यावर हे फेरीवाले पुन्हा ठाण मांडून बसतात, अशी तक्रार दहिसर येथील प्रवासी महेश कुडाळकर यांनी केली.

रेल्वे कायद्यातील १४४व्या कलमानुसार फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करणे शक्य नसल्याची असमर्थता दाखवणारे रेल्वे सुरक्षा दल रेल्वेमंत्री किंवा तत्सम राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यक्रमादरम्यान या फेरीवाल्यांना कसे पिटाळून लावतात? त्या वेळी या फेरीवाल्यांसह काही मिलीभगत असते का, असा प्रश्नही या निमित्ताने उपनगरीय प्रवासी एकता महासंघाच्या नंदकुमार देशमुख यांनी उपस्थित केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 3:58 am

Web Title: railway police only take punitive action against hawkers
Next Stories
1 हरितपट्टय़ातील नागरी समस्या
2 हृदयप्रत्यारोपणात सातपट वाढ
3 एसी लोकलची व्हॉट्सअ‍ॅपवर ‘धाव’
Just Now!
X