सर्वासाठी उपनगरी रेल्वे चालविण्याची तयारी सुरु

मुंबई : अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे १ नोव्हेंबरपासून उपनगरी रेल्वेफेऱ्यांत (लोकल) आणखी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ६१० फेऱ्यांची भर पडणार असून एकूण २०२० फेऱ्या धावतील, अशी माहिती मध्य व पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

मध्य रेल्वेवरील सध्याच्या ७०६ फेऱ्यांत आणखी ३१४, तर पश्चिम रेल्वेवरील ७०४ फेऱ्यांमध्ये २९६ फेऱ्यांची भर पडेल. यामुळे या दोन्ही मार्गावर मिळून एकूण २०२० फेऱ्या धावतील, अशी माहिती देण्यात आली.

सर्वासाठी लोकल प्रवासाची विनंती राज्य सरकारने रेल्वेला केली आहे. त्यावरून सध्या चर्चा सुरू असली तरी, त्याच्याच तयारीचा भाग म्हणून रेल्वेने लोकल फेऱ्या वाढवण्यास सुरुवात केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. टाळेबंदीआधी दोन्ही मार्गावर ३,१४१ लोकल फेऱ्या धावत होत्या. येत्या आठवडय़ात सामान्यांसाठी लोकलचा निर्णय होताच सर्व फेऱ्या पूर्ववत होतील, असेही सांगण्यात आले.

पश्चिम रेल्वेवर २९६ फेऱ्या वाढणार आहेत. यातील ७६ फेऱ्या सकाळी गर्दीच्या वेळी आणि ५१ फेऱ्या सायंकाळी गर्दीच्या वेळी धावतील. सध्या ६ महिला विशेष लोकल फेऱ्यांत आणखी ४ फेऱ्या, तर वातानुकूलित लोकलच्या १० फेऱ्यात २ फेऱ्यांची भर पडेल. या वाढीव फेऱ्यांत सर्वाधिक ६५ फेऱ्या विरार-अंधेरीदरम्यान, ४३ फेऱ्या विरार ते बोरिवलीदरम्यान आणि ४२ फेऱ्या बोरिवली ते चर्चगेट दरम्यान धावतील.