बोलघेवडे लोकप्रतिनिधी आता कोठे गेले ?
उपनगरीय रेल्वे सेवेबाबत काही खुट्ट झाले तरी मुंबई-ठाण्यातील खासदार एकेकाळी तुटून पडत, पत्रकांचा भडीमार करीत असत. मात्र गेले पाच दिवस मुंबई, ठाण्यातील लाखो प्रवासी हालअपेष्टा सहन करीत असूनही आणि सहा प्रवाशांचा मृत्यू होऊनही या परिसरातील एकाही खासदाराने याबाबत साधे तोंड उघडलेले नाही.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील दुरुस्तीच्या कामामुळे दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येत असल्याचे रेल्वेने जाहीर केले होते. पण ही मुदत उलटून चार दिवस झाले तरी रेल्वेचा गोंधळ कायम आहे. गाडय़ा रद्द होण्याची संख्या कमी झालेली नाही. परिणामी गर्दी वाढली आहे. गर्दीतून प्रवास करताना पडून सहा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. अजूनही गोंधळ कमी झालेला नाही. एवढे होऊनही मुंबईतील सहा किंवा ठाणे वा कल्याणच्या खासदाराने या विरोधात आवाज उठविला नाही. पहिल्या दोन दिवसांत गोंधळ होत असताना एकही खासदार फिरकला नाही. रेल्वे प्रशासनाकडून आमदारांच्या पत्राला किंवा ते स्वत: गेले तरी दाद दिली जात नाही. खासदाराच्या दबावापुढे रेल्वे प्रशासन झुकते, असा अनुभव आहे. मात्र, या गोंधळाच्या वेळी एकही खासदार पुढे आला नाही. मुंबईत काँग्रेसचे पाच खासदार आहेत, पण एकही खासदार पुढे आला नाही याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी, काँग्रेसने ही बाब गांभीर्याने घेतल्याचे सांगितले. मात्र खासदार गेले कोठे, याचे त्यांच्याकडे उत्तर नव्हते.
गर्दीमुळे चेंगराचेंगरीत पडून मृत्युमुखी पडलेल्यांचा अपघाती मृत्यू मानण्यास रेल्वे प्रशासन तयार नाही. परिणामी मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना मदत मिळू शकणार नाही. खासदारांनी दबाव आणल्यास रेल्वे प्रशासनावर दबाव येऊ शकेल. पण बोलघेवडे खासदार गेले कोठे, हा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.