मेगाब्लॉकचा त्रास संपत असतानाच रविवारी हार्बर मार्गावर जुईनगर स्थानकाजवळ रेल्वे वसाहतीतील रहिवाशांनी रेल्वे रोको आंदोलन केल्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक संध्याकाळी उशिरापर्यंत विस्कळीत झाली होती. जुईनगर येथील या वसाहतीत गेले दोन महिने पाणीपुरवठय़ाच्या समस्या असून प्रशासन त्याकडे लक्ष पुरवत नसल्याने अखेर या रहिवाशांनी हा मार्ग अवलंबल्याचे सूत्रांनी सांगितले. तब्बल २०-२५ मिनिटे चाललेल्या या आंदोलनानंतर हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. यामुळे पाच सेवांना फटका बसला आहे.

जुईनगर येथील रेल्वे वसाहतीत १५० ते २०० कुटुंबे राहतात. ही सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांची कुटुंबे असून त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठय़ाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अनियमित आणि अशुद्ध पाणीपुरवठय़ामुळे बेजार झालेल्या या रहिवासी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी मध्य रेल्वे प्रशासनाकडे याबाबत तक्रारीही केल्या. मात्र रेल्वे प्रशासनाने कर्मचाऱ्यांची ही अडचण सोडवण्यासाठी काहीही उपाययोजना केल्या नाहीत. अखेर हा प्रकार असह्य़ होऊन रेल्वे वसाहतीतील महिलांनी रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेमार्गावर ठाण मांडले.
प्रशासनाचा निषेध करत त्यांनी पाणीपुरवठय़ाची समस्या दूर करण्याची मागणीही केली. तब्बल २० ते २५ मिनिटे चाललेल्या या आंदोलनानंतर या महिलांना रेल्वे रुळांवरून बाजूला करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी ५.५५च्या सुमारास रेल्वेसेवा पूर्ववत झाली.