10 July 2020

News Flash

रेल्वेतून गृहरक्षक हद्दपार!

वेतनाकरिता निधी नसल्याचे सांगत ५०० जवानांची कपात

वेतनाकरिता निधी नसल्याचे सांगत ५०० जवानांची कपात; सुरक्षेची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर

मुंबई : लोकल प्रवासात रात्रीच्या वेळी महिला डब्यातील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी वाहणाऱ्या उरल्यासुरल्या ५०० गृहरक्षक जवानांच्या (होमगार्ड) वेतनाकरिता निधी नसल्याचे कारण देत घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. होमगार्डचे उरलेसुरले सुरक्षाकवचही गळून पडल्याने महिलांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी अपुऱ्या संख्येने असलेल्या लोहमार्ग पोलिसांना (जीआरपी) पेलावी लागणार आहे. परिणामी रात्रीच्या वेळी कमी अंतराऐवजी लांबच्या मार्गावरील लोकलमधील महिला डब्यातील सुरक्षेवर अधिक भर दिला जात आहे.

लोकलच्या महिला डब्यातील सुरक्षा, फलाट व पादचारी पुलांवरील गर्दी नियंत्रणासाठी मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर होमगार्ड तैनात करण्यात आले. लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. लोकल प्रवासात महिला प्रवाशांची छेडछाड, विनयभंग, मारहाणीचे प्रकार होतात. महिला प्रवाशांवर गर्दुल्ल्यांकडूनही हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत २१२ लोकलच्या प्रत्येक तीन महिला डब्यांत होमगार्डची नियुक्ती करण्यात आली. पश्चिम व मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील स्थानक व लोकल गाडय़ांमध्ये मिळून दीड हजार होमगार्ड तैनात होते. मात्र राज्य शासनाकडून न मिळालेले अनुदान व होमगार्डना मिळत नसलेल्या मानधनामुळे होमगार्ड खात्याकडून यामध्ये कपात करण्यात आली. दहा दिवसांपूर्वी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील होमगार्डचे मनुष्यबळ एक हजारांनी कमी केले. त्यामुळे रेल्वे फलाट व पादचारी पुलांवरील गर्दीच्या नियंत्रणासाठी उर्वरित ५०० होमगार्ड न वापरता महिला डब्यातील सुरक्षेसाठीच त्यांची नियुक्ती ठेवली. मात्र ५०० होमगार्ड कमी करत असल्याचे आदेश लोहमार्ग पोलिसांना होमगार्ड विभागाकडून नुकतेच दिले. त्यामुळे उर्वरित होमगार्डही काढून घेण्यात आले असून रात्रीच्या प्रवासातील महिला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवरच आली आहे.

उपनगरीय रेल्वे मार्गावरील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ३ हजार ३०० लोहमार्ग पोलिसांची मंजुरी आहे.

मात्र यात २७९ पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे उर्वरित मनुष्यबळात या पोलिसांना काम करावे लागते. होमगार्डही नसल्याने लोकल डब्यातील सुरक्षेची जबाबदारी पेलताना त्यांची मोठी तारांबळ उडत आहे.

ही तारांबळ कमी करण्यासाठी लांबच्या मार्गावरील लोकल गाडय़ांमधील तीन महिला डब्यात लोहमार्ग पोलीस तैनात केले जात आहेत.

यातही काही लोकलमध्ये तीनपैकी एका किंवा दोन डब्यात पोलीस तैनात करताना मोठी कसरत होत आहे. परिणामी महिला प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच आली आहे.

अनुदानापेक्षा खर्च जास्त

सरकारकडून होमगार्डच्या मानधनाकरिता १७५ कोटी रुपये मिळणार आहेत. आतापर्यंत १३६ कोटी रुपये अनुदान मिळाले आहे. उर्वरित मानधन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आतापर्यंत यापोटी २३० कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे अनुदानाच्या तुलनेत मानधनावरील खर्च अधिक आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी असलेल्या उर्वरित ५०० होमगार्डनाही मानधनाअभावी बोलावून घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यांना मानधन मिळावे यासाठी राज्य सरकारकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच यावर तोडगा निघेल.

– संजय पांडे, पोलीस महासंचालक, होमगार्ड

महिला प्रवाशांसाठी उपलब्ध मनुष्यबळातून चांगली सुरक्षा देण्याचा प्रयत्न करत आहोत. होमगार्ड पुन्हा मिळावेत यासाठी चर्चा सुरू आहे.

– रवींद्र सेनगावकर, पोलीस आयुक्त, लोहमार्ग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 3:08 am

Web Title: railway removed 500 home guard from service in mumbai zws 70
Next Stories
1 ‘करोना’मुळे कोंबडी व्यवसायाला कात्री
2 ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाचा ‘मराठा लाईट इन्फण्ट्री’मध्ये संग्रह
3 तपासाबाबत राज्य सरकारची खेळी!
Just Now!
X