लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे आरक्षित तिकीट, तसेच प्रतीक्षायादीवरील तिकीट रद्द करण्यासाठी प्रवाशांना आता जादा शुल्क भरावे लागणार आहे. त्याचबरोबर सुपरफास्ट गाडय़ांचे आरक्षण आणि अधिपूरक (सप्लीमेंटरी) शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. ही वाढ येत्या १ एप्रिलपासून अंमलात येणार आहे.रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये ही वाढ प्रस्तावित केली आहे. प्रतीक्षायादीवरील तसेच आरएसी तिकीट रद्द करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क पाच ते १० रुपयांनी वाढविण्यात आले आहे. आरक्षित तिकीट रद्द करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात १० ते ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
सुपरफास्ट गाडय़ांचे आरक्षण शुल्क तसेच अधिपूरक शुल्कामध्येही वाढ करण्यात आली आहे. मात्र सुपरफास्ट गाडय़ांतील स्लीपर आणि दुसऱ्या वर्गाच्या आरक्षण शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र अन्य श्रेणीतील आरक्षण शुल्क १५ ते २५ रुपयांनी वाढविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अधिपूरक शुल्क श्रेणीनुसार पाच ते २५ रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.