रेल्वे बोर्डाने पश्चिम रेल्वेवर लागू केलेला यात्राविस्तार तिकिटांच्या बाबतीतील ‘बिनडोक’ नियम प्रवाशांच्या तीव्र नाराजीनंतर मागे घेण्याचा निर्णय गुरुवारी पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’च्या गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध झाले. त्यानंतर पश्चिम रेल्वेने लगेचच हा नियम रद्द करून यात्राविस्तार तिकिटाची सुविधा पहिल्याप्रमाणे सर्वच स्थानकांवरून तसेच कोणत्याही वर्गाच्या पासधारकांना कोणत्याही वर्गासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेवरही हा यात्रासंकोचाचा नियम लादला जाणार होता, तो आता टळला आहे.
मासिक किंवा त्रमासिक पासधारकांना आपल्या पासव्यतिरिक्त पुढे प्रवास करायचा असेल, तर यात्राविस्तार तिकीट काढावे लागते. हे तिकीट कोणत्याही स्थानकावरून मिळण्याची तरतूद होती. मात्र यात्राविस्तार तिकिटे पासवर उल्लेख असलेली स्थानके आणि जंक्शन असलेली स्थानके येथेच उपलब्ध होतील, असा नियम पश्चिम रेल्वेने चार-पाच दिवसांपूर्वी अमलात आणला होता. तसेच पास ज्या दर्जाचा असेल, त्याच दर्जाचे यात्राविस्तार तिकीट काढावे लागेल, अशीही सक्ती होती.