मध्य रेल्वेला तीन हजार, तर पश्चिम रेल्वेला ७०० जवानांची गरज

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असली तरी त्यातून प्रशासनाने धडा घेतल्याचे दिसत नाही. या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली तरी मध्य व पश्चिम रेल्वेवरील सुरक्षा व्यवस्था तोकडीच आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. मध्य रेल्वेला मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणखी जवळपास तीन हजार आणि पश्चिम रेल्वेला ७०० पेक्षा जास्त जवानांची गरज आहे.

सीएसएमटी स्थानकात दोन दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात काही प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. तर काही जखमीही झाले. हल्ल्यात बळी पडलेल्यांमध्ये पोलिसांचाही समावेश होता. यामुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांची सुरक्षाही रामभरोसेच असल्याचे समोर आले. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने सुरक्षेचे उपाय म्हणून एकात्मिक सुरक्षा प्रणाली अंतर्गत मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे, डोअर मेटल डिटेक्टर, हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टर, बॅगेज स्कॅनरसह अन्य यंत्रणा बसवून सुरक्षा मजबूत केली, परंतु ही व्यवस्था मनुष्यबळाअभावी अपूर्ण आहे. रेल्वेच्या ८० लाखांपेक्षा जास्त प्रवाशांच्या सुरक्षेकरिता रेल्वेकडे असलेले सुरक्षा दल अपुरे आहे. ते मनुष्यबळ वाढविण्यात रेल्वेला फारसे यश आलेले नाही.

मध्य रेल्वेवरील रेल्वे सुरक्षा दलाच्या मुंबई विभागाचा पसारा सीएसएमटीपासून इगतपुरी, लोणावळापर्यंत आहे. यासाठी २,१०० जवानांची गरज आहे. त्यास मंजुरीही आहे. परंतु सध्या १,८०० जवानच कार्यरत आहेत. अजूनही ३०० जवानांची पदे रिक्त आहेत. कार्यरत असणाऱ्या १,८०० जवानांमध्येही १,१०० जवान मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सीएसएमटी ते कर्जत, कसारा, खोपोली आणि वाशी, पनवेल, खारकोपपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. मध्य रेल्वेवरील उपनगरीय रेल्वेवरून ४२ लाख ७२ हजार प्रवासी प्रवास करतात.

त्यांच्या तुलनेत जवानांची संख्या कमी असून आणखी तीन हजार जवानांची गरज आहे.

हीच परिस्थिती पश्चिम रेल्वेचीही आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचा पसारा हा सुरत, अहमदाबादपर्यंत असून एकूण १,८०० जवान तैनात असतात. यातही १,१०० जवान चर्चगेट ते डहाणूपर्यंत कार्यरत आहेत. मुंबई विभागासाठी आणखी १,२०० जवानांची गरज असून चर्चगेट ते डहाणूसाठी वेगळ्या ७०० पेक्षा जास्त जवानांची गरज असल्याचे रेल्वे सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. यासाठी रेल्वे मंत्रालयाकडेही सतत पाठपुरावा केला जात आहे.

आमचे मनुष्यबळ कमी आहे हे मान्य आहे. ते वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सध्या मुंबईतील लोकल गाडय़ांतून प्रवास करणारी प्रवासी संख्या पाहता जास्तीत तीन हजार जवानांची गरज आहे.

– सचिन भालोदे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे सुरक्षा दल