डीसी-एसी परिवर्तनाला रेल्वे सुरक्षा आयुक्तांची सशर्त मंजुरी
मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हार्बर तसेच ट्रान्स हार्बर मार्गाच्या डीसी-एसी परिवर्तनाला मंजुरी दिली असून रेल्वे बोर्डानेही काही अटी घालत या परिवर्तनाच्या कामाचा मार्ग मोकळा केला आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर डीसी-एसी परिवर्तनाचे काम रेल्वे बोर्डाकडून ही सशर्त मंजुरी न आल्याने रखडले होते. या मार्गावरील टिळक पूल, करीरोड येथील पूल, हँकॉक पूल, कारनॅक पूल आदी ठिकाणी ओव्हरहेड वायर आणि पुलाचा खालचा भाग यांतील अंतर खूप कमी असल्याने येथे वेगमर्यादा घालून गाडी चालवण्याची परवानगी देण्यात आली होती. आता हार्बर मार्गावर रे रोड, गुरू तेगबहाद्दूरनगर, शिवडी येथील पादचारी पूल, ट्रान्स हार्बरवरील पूल अशा चार ठिकाणी हाच अडथळा येत आहे.
त्याचप्रमाणे चुनाभट्टी, रबाळे, तुर्भे येथे विद्युत यंत्रणांचे मोठमोठे खांब असून उच्च दाबाच्या विद्युत तारा जवळ आहेत. २५००० व्होल्ट एसी विद्युत प्रवाहामुळे येथे रेल्वेच्या परिचालनाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी व्यक्त केली होती. याबाबतचे पत्र रेल्वे बोर्ड आणि मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्त यांच्याकडेही पाठवण्यात आले होते.
रेल्वे बोर्डाने या दोन्ही अडथळ्यांवर मात करण्यासाठी मध्य रेल्वेला सशर्त मंजुरी दिली आहे. पुलांच्या दोन्ही बाजूंना ‘धोकादायक’ अशी पाटी लावून तेथे वेगमर्यादेचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच शक्य असल्यास पुलांखाली रेल्वेरूळ खाली घेण्याचीही सूचना रेल्वे बोर्डाने केली आहे. तसेच विजेचे खांब असलेल्या ठिकाणी दर सहा महिन्यांनी रेल्वे आणि वीज कंपन्यांचे अधिकारी यांनी निरीक्षण करावे, असेही रेल्वे बोर्डाने सूचित केले आहे. या सर्व सूचना ध्यानात घेऊनच मध्य रेल्वेने डीसी-एसी परिवर्तनाचे नियोजन केले आहे. येत्या शनिवार-रविवारच्या मध्यरात्री हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या विद्युत अभियंता विभागातील अधिकाऱ्याने दिली.