सुशांत मोरे

वातानुकूलित लोकलमध्ये प्रवासी कमी तरीही उत्पन्न जास्त; गाडय़ांची संख्या वाढवण्याचा विचार, भाडेकपातीबाबत मौन

पश्चिम रेल्वेवर सुमारे वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या वातानुकूलित लोकल गाडीला क्षमतेइतके प्रवासी मिळत नसले तरी, विरार-चर्चगेटदरम्यान धावणारी ही लोकल पश्चिम रेल्वेकरिता चांगलीच फायदेशीर ठरत आहे. ही लोकल चालवण्यातून रेल्वेला वर्षांला तब्बल साडेतीन कोटींचा फायदा मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांची अपेक्षित गर्दी नसतानाही मुंबईतील वातानुकूलित गाडय़ांच्या संख्येत वाढ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, वातानुकूलित लोकल इतकी फायद्याची ठरत असेल तर मग तिच्या तिकीटदरांत कपात करून ती अधिकाधिक प्रवाशांना परवडेल, अशी चालवण्याची मागणीही जोर धरत आहे.

पश्चिम रेल्वेवर २५ डिसेंबर २०१७ मध्ये पहिली वातानुकूलित लोकल धावली. या गाडीकरिता तिकीट २०५ रुपये आणि मासिक पास २,०४० रुपये असा प्रवास दर आहे. हे दर सर्वसामान्य तिकिटांच्या तुलनेत खूप जास्त असल्याने प्रवाशांकडून गाडीला पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. त्यात नेहमीच्या लोकलच्या फेऱ्या रद्द करून या गाडीच्या फेऱ्या चालविण्यात येत असल्याने प्रवाशांचा या गाडीला विरोधही आहे. ही गाडी पूर्ण प्रवासीक्षमतेने चालत नसली तरी पश्चिम रेल्वेने वर्षभरात १८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. साध्या लोकलमधून वर्षांला सहा कोटी रुपये उत्पन्न आणि बारा कोटी रुपये खर्च आहे. थोडक्यात या गाडय़ांमधून तोटाच होतो. दुसरीकडे एका वातानुकूलित लोकलमागे १४ कोटी ५० लाख रुपये खर्च असून १८ कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकल रेल्वेसाठी फायद्याची ठरत आहे.

गेल्या अनेक वर्षांत रेल्वेचे भाडे वाढलेले नाही. रेल्वेचा तोटा भरून काढण्याकरिता वातानुकूलित गाडय़ा फायद्याच्या ठरतील असा रेल्वेचा अंदाज आहे. त्यामुळेच मुंबई रेल्वे विकास महामंडळाने वातानुकूलित लोकलची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. एमयूटीपी-३ मधून मुंबईत दाखल होणाऱ्या ४७ आणि एमयूटीपी-३ एअंतर्गत येणाऱ्या २१० गाडय़ा वातानुकूलित असाव्या असा मंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी कर्ज घेण्यात येणार आहे.  कर्जाबाबतचा अहवाल तयार करताना मुंबईतील एकुलत्या एक गाडीच्या फायद्याची गणिते मांडण्यात आली आहेत.

येत्या पाच ते सहा वर्षांत मध्य व पश्चिम रेल्वेवर २५० वातानुकूलित व ९५ बिगर वातानुकूलित गाडय़ा असतील या दृष्टीने रेल्वे प्रयत्नशील आहे. सध्याच्या घडीला केवळ एकच वातानुकूलित गाडी मुंबईत धावते आहे. तर २५० बिगर वातानुकूलित गाडय़ा पश्चिम व मध्य रेल्वेवर धावत आहेत. संपूर्ण वातानुकूलित लोकलबरोबरच सहा-सहा डब्यांची अशी बारा डब्यांची अर्धवातानुकूलित लोकलही चालवण्याचा पर्याय आहे.

दुसरीकडे, बहुतांश प्रवाशांसाठी वातानुकूलित लोकल परवडणारी नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांचा या गाडीला नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.  दिवसाला बारा फेऱ्या मारणाऱ्या वातानुकूलित गाडीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न जास्त आहे. भाडे कमी केल्यास अधिकाधिक प्रवाशांना या गाडीचा लाभ घेता येईल. त्यामुळे ती पूर्ण क्षमतेनेही चालविता येईल. परिणामी या गाडीचे भाडे कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

२५७ वातानुकूलित लोकल आणणार

*  एमआरव्हीसीच्या एमयूटीपी-३मध्ये ४७ वातानुकूलित लोकलसह अन्य महत्त्वाचे प्रकल्पही आहेत. त्यासाठी एकूण १०,९४७ कोटी रुपये खर्च येणार असून सहा ते सात हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळवण्याचा प्रयत्न आहे. वातानुकूलित लोकलसाठीच ३,४९१ कोटी रुपये खर्च येणार आहे.

*  एमयूटीपी-३ ए मध्येही २१० वातानुकूलित लोकलसह इतर प्रकल्प आहेत. त्यासाठी एकूण ५४ हजार ७७७ कोटी रुपये खर्च येईल. यासाठी १४ हजार कोटी रुपयांचे कर्ज हवे आहे. यामध्ये वातानुकूलित लोकलचा खर्च १७ हजार ३७४ कोटी रुपये एवढा आहे.

रेल्वे ही एक सेवा आहे. तो काही व्यवसाय नाही. कोणती लोकल फायदेशीर व कोणती तोटय़ाची हा विचार रेल्वेने करावा. मात्र प्रवास परवडणारा असला पाहिजे. वातानुकूलित लोकलचे भाडे जास्त आहे. तसेच पुढे गाडय़ा पंधरा डबा करण्याचा विचार आहे. त्यातील सुरुवातीचे तीन डबेच वातानुकूलित करावे. तशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. वातानुकूलित लोकलचे भाडे कमीच असावे.

– सुभाष गुप्ता, रेल्वे यात्री परिषद, अध्यक्ष