23 July 2018

News Flash

बँक खात्यातून रेल्वेचा पास!

प्रवाशांना घरपोच पास मिळण्यासाठी ईसीएस पद्धतीचा अवलंब करण्यावरही भर दिला जात आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

प्रवाशांना ‘ईसीएस’ चा नवा पर्याय उपलब्ध; घरपोच पास मिळण्याचीही सुविधा

दिवसेंदिवस उपनगरीय रेल्वे स्थानकांवर तिकिटांची गर्दी वाढत चालली असून त्यावर उपाय म्हणून काढण्यात आलेल्या एटीव्हीएम यंत्रानेदेखील तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी झालेल्या नाहीत. या तिकीट खिडकीवरील गर्दी कमी करण्यासाठी आता रेल्वेने एटीव्हीएम कार्डाच्या वापराप्रमाणेच बँक खात्यातून ईसीएसच्या साहाय्याने पास काढण्याची सुविधा देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे तिकीट काढण्यासाठी अजून एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

रेल्वे स्थानकांवर एटीव्हीएमसह अन्य पर्याय उपलब्ध झाल्यानंतरही तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी होत नसल्याची हल्ली प्रमुख तक्रार आहे. रेल्वेलादेखील एटीव्हीएम यंत्रामध्ये असणाऱ्या त्रुटी, मोबाइल अ‍ॅपवरून कमी प्रमाणात होणारी तिकीट विक्री आदी विविध कारणांमुळे तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करणे कठीण ठरले आहे. त्यासाठीच रेल्वेने डेबिट कार्ड, ईसीएच्या साहाय्याने पासविक्रीचा पर्याय उपलब्ध करण्याचा मानस रचला आहे. प्रवाशांना ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावरून डेबिट कार्डाच्या साहाय्याने मासिक पास काढण्याची सुविधा मिळू शकेल.

‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉम्रेशन सिस्टीम’ (क्रिस)ने या पद्धतीने तिकीट देण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून केवळ स्मार्ट कार्डावर अवलंबून न राहता प्रवाशांना दुसरेही पर्याय मिळण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे ‘क्रिस’च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रवाशांना घरपोच पास मिळण्यासाठी ईसीएस पद्धतीचा अवलंब करण्यावरही भर दिला जात आहे. त्यासाठी, प्रवाशांनी तिकीट खिडकीवर घराचा पत्ता नोंदवणे आवश्यक असून त्यानंतर ईसीएसच्या साहाय्याने पास काढणे शक्य होऊ शकेल. त्यानुसार, प्रवाशांना १३९ क्रमांकावरून पास संपण्याच्या १० दिवस अगोदर एसएमएस मिळणार आहे. ईसीएसच्या साहाय्याने मासिक, त्रमासिक, अर्धवार्षकि, वार्षकि पास काढण्याचा पर्याय राहणार आहे. ईसीएससाठी प्रवाशांनी संमती दिल्यानंतर बँकेच्या खात्यातून पासाची रक्कम वळती केली जाऊन पासधारकास त्याचा पास घरपोच मिळण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

डेबिट कार्डच्या साहाय्याने मोबाइल तिकीट

डेबिट वा क्रेडिट कार्डाच्या साहाय्याने कोणत्याही एटीव्हीएमवरून दैनंदिन तिकीट वा पास घेणे शक्य होण्याचा उद्देश त्यातून साध्य होईल. त्यासाठी ‘क्रिस’कडून स्टेट बँक ऑफ इंडियाशी प्राथमिक चर्चा सुरू असून या पद्धतीने तिकीट, पास विक्रीसाठी यंत्रे पुरवण्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचे सांगितले जाते.  डेबिट कार्डाच्या साहाय्याने मोबाइल तिकीटही काढता येईल यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

First Published on November 28, 2016 4:11 am

Web Title: railway season ticket now from bank account