३३ कर्मचाऱ्यांपैकी १७ रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी

मुंबई : करोनाबाधितांवर यशस्वी उपचार होण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेतील कर्मचाऱ्यांनीही पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत रेल्वेच्या मुंबईतील जगजीवनराम रुग्णालयात ३३ कर्मचाऱ्यांनी रक्तद्रव दान के ले आहे. यामध्ये १७ रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आहेत.

टाळेबंदीतही रेल्वेचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. रेल्वे सुरक्षा दल, मोटरमन, लोको पायलट, कारशेडमधील अनेक कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कु टुंबातील सदस्यही करोनाबाधित झाले आहेत. आतापर्यंत १,२२१ कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत, तर १४३ जणांचा मृत्यू झाला असून १३९ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

करोनामुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत आपले रक्तद्रव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रमाण येत्या काळात वाढवण्यात येईल, अशी माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेने दिली.  करोनातून बरे झालेल्यांचे रक्तद्रव घेऊन त्याद्वारे करोनाबाधितांवर उपचार के ले जातात. त्यानुसार रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात आतापर्यंत ३३ कर्मचाऱ्यांनी रक्तद्रव दान के ल्याचे सांगण्यात आले. यातील १९ पश्चिम रेल्वेचे, मध्य रेल्वेचे १३ आणि एका उत्तर पूर्व रेल्वेच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. मध्य रेल्वेवरील रक्तद्रव दान के लेल्यांपैकी १० जण रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आहेत. तर पश्चिम रेल्वेवरील सात सुरक्षा दलाचे जवान असून उर्वरित कर्मचारी हे सिग्नल यंत्रणा, तिकीट निरीक्षक व अन्य विभागांतील असल्याची माहिती देण्यात आली.

रक्तद्रव दानासाठी महिलांचाही पुढाकार

रक्तद्रव दान करण्यासाठी महिलांनीही पुढाकार घेतला आहे. चार पश्चिम रेल्वे कर्मचारी, एका उत्तर पूर्वी विभागातील महिला कर्मचाऱ्याचा यात समावेश आहे.