कल्याणहून कसारा आणि कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या आणि या मार्गावरून कल्याणकडे येणाऱ्या सर्व गाडय़ा सोमवारी सकाळी तब्बल २० मिनिटांसाठी जागच्या जागी उभ्या राहिल्या. ‘टाटा पॉवर’ या कंपनीचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सकाळी १०.५० ते ११.१० या दरम्यान कल्याण ते इगतपुरी आणि कल्याण ते लोणावळा या स्थानकांदरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद होती़
सोमवारी सकाळी पावणे अकरानंतर कल्याणहून लोणावळा आणि इगतपुरी या दिशेने रवाना झालेल्या सर्व मेल-एक्सप्रेस आणि उपनगरी गाडय़ा अचानक थांबल्या. ओव्हरहेड वायर तुटल्याने गाडय़ा थांबल्याचा निष्कर्ष प्रवाशांनी सुरुवातीला काढला. मात्र टाटा पॉवरचा वीज पुरवठा खंडित झाल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे समजले. अखेर ११.१५च्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाला आणि वाहतूक पुन्हा सुरू झाली. सुदैवाने गर्दीची वेळ टळून गेल्यानंतर ही घटना घडल्याने त्याचा फारसा परिणाम रेल्वे सेवेवर झाला नाही. या २० मिनिटांच्या गोंधळामुळे एकही सेवा रद्द केली नसल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.