जीटीबी रेल्वे स्थानकात  हास्यकट्टा, नाटुकली; गुरु नानक महाविद्यालयाचा पुढाका

मुंबईतील रेल्वे स्थानकांची दिवसेंदिवस होणारी बकाल अवस्था दूर करण्यासाठी या रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्धार काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरू तेग बहादूरनगर रेल्वे स्थानकावर स्वच्छता आणि सौंदर्यता अभियानास या विद्यार्थ्यांनी सुरुवात केली आहे.

रेल्वे स्थानकावर पान खाऊन भिंतीवर मारलेल्या पिचकाऱ्या, प्लॅस्टिक कचरा अशा अनेक कारणांमुळे रेल्वे स्थानके बकाल होत चालली आहेत.  गुरू तेग बहादूरनगर (जीटीबी) या रेल्वे स्थानकाचीही अशीच अवस्था होती. मात्र यावर उपाय म्हणून गुरू नानक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही स्वच्छता आणि कलेच्या माध्यमातून या रेल्वे स्थानक स्वच्छ आणि सुंदर करण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने कामास सुरुवातही झाली आहे. भविष्यात हास्यकट्टा, नाटुकली आदीच्या माध्यमातून या परिसराला जिवंतपणा आणून, स्थानकाशी प्रवाशांचे कायमचे नाते जुळविण्याचाही विद्यार्थ्यांचा विचार आहे. हम सब बच्चे, गुरू नानक के.., स्वच्छ भारत-स्वस्थ भारत या घोषणा देत गेले काही दिवस महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रत्येक रविवारी सकाळी आपल्या अभ्यासातून वेळ काढून जीटीबी रेल्वे स्थानक स्वच्छ करण्याचे काम करत आहेत. प्रत्येक विद्यार्थी कोणत्याही प्रशिक्षणाविना येथे आपल्या चित्रकलेतून वारली चित्रे, स्वच्छतेची घोषवाक्ये लिहून प्रवाशांना सार्वजनिक ठिकाणी कचरा न करण्याच्या त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचे काम करत आहेत. सुलेखनकार अच्युत पालव यांनीदेखील नुकतेच जीटीबीनगर रेल्वे स्थानकात हजेरी लावत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. इतकेच नव्हे तर आपल्या सुलेखनाने त्यांनी विद्यार्थ्यांच्या कामाला हातभारही लावला.

रेल्वे स्थानकात आमच्या महाविद्यालयाद्वारे भविष्यात पुढे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. येथील प्रवाशांचा शीण घालवण्यासाठी योगाचे प्रकार, हास्यकट्टा, नाटुकले अशा माध्यमांतून जनजागृती करण्यात येणार आहे.

– डॉ. विजय दाभोळकर, प्राचार्य, गुरू नानक महाविद्यालय

मुलांमध्ये कोणतीही कला वयाच्या ७ ते ८व्या वर्षीपासूनच जोपासणे गरजेचे आहे. मात्र शाळेच्या अभ्यासक्रमातूनच चित्रकला विषय काढून टाकल्याने पुढील पिढीत ही कला रुजणार कशी? अशा उपक्रमांमधून तरुणांच्याही विचारांना अवकाश लाभते.

– अच्युत पालव, सुलेखनकार