तिकीट खिडक्यांसमोर रांगा; अंतरनियमाचे तीनतेरा; कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून लागू करण्यात आलेले निर्बंध सोमवारपासून शिथिल झाल्यानंतर मुंबई महानगरात सरकारी कार्यालयांबरोबरच खासगी कार्यालयांतील उपस्थिती वाढली. परिणामी झटपट प्रवासासाठी अनेकांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. त्यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये गर्दी उसळली. करोनाच्या सर्व नियमांचा विसर या वेळी प्रवाशांना झाला आणि त्याकडे रेल्वे व स्थानिक पालिकांनीही दुर्लक्षच के ले. खासगी कार्यालय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा नसतानाही अनेकांनी रेल्वे स्थानकांकडे धाव घेतल्याने स्थानक हद्दीबाहेरही रांगा गेल्याचे चित्र काही स्थानकांत होते.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासावर बंधने आली. फक्त सरकारी कर्मचारी, पालिका व त्यांच्या परिवहन सेवांचे कर्मचारी, रुग्णालय कर्मचारी, विमान सेवांशी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकल फेऱ्यांचे नियोजन के ले. पश्चिम रेल्वेवर दररोज ९ ते ११ लाखांपर्यंत, तर मध्य रेल्वेवर दररोज १० लाखांपर्यंत प्र्रवासी प्रवास करत होते. मात्र, अत्यावश्यक सेवा वगळता इतर क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी नसली तरीही सरकारी कार्यालयांमधील उपस्थिती वाढल्यामुळे सोमवारी रेल्वे स्थानकांवर गर्दी झाली.

मध्य रेल्वेवरील दादर, कु र्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, ठाणे, दिवा, कल्याण, डोंबिवलीसह अन्य स्थानके  आणि हार्बरवरीलही काही स्थानके , शिवाय पश्चिम रेल्वेवरील वांद्रे, दादर, खार, सांताक्रूझ, अंधेरी, बोरिवली या स्थानकांतील तिकीट खिडक्यांसमोर प्रचंड गर्दी होती. काही ठिकाणी तिकीट खिडक्यांच्या रांगा या स्थानक हद्दीबाहेरही गेल्या होत्या. तिकीट, पास मिळवताना काही खिडक्यांवर कर्मचारी व प्रवाशांमध्ये वादही होत होते. काही स्थानकांत खासगी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना तिकीट नाकारले जात होते, तर काहींना ओळखपत्र न बघताच सरसकट तिकीट दिले जात होते. प्रवास करणाऱ्यांमध्ये महिलांचीही संख्या अधिक दिसत होती. गर्दी, गोंधळ असे चित्र असतानाच लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी, होमगार्ड हे फक्त बघ्याची भूमिका घेत होते.

 

उपस्थितीच्या निकषांमुळे गोंधळ

मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार या महापालिका तिसऱ्या स्तरांत मोडतात. या स्तरात सरकारी व खासगी कार्यालयांतील उपस्थिती ५० टक्क्यांपर्यंत, तर ठाणे, नवी मुंबई या महापालिका स्तर दोनमध्ये येतात. यातील सरकारी व खासगी कार्यालयीन उपस्थितीत १०० टक्के  करण्यात आली आहे. मुंबई, ठाण्यात आधी १५ ते २५ टक्के पर्यंत सरकारी कर्मचारी उपस्थिती होती. उपस्थितीचे निकष बदलल्यानंतर शासनाच्या आदेशानंतर सरकारी व खासगी कार्यालयांच्या संबंधित विभागांनी कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे नेहमीप्रमाणे वेळेत कार्यालय गाठण्यासाठी सकाळी आठपासून अनेकांनी रेल्वे स्थानकांकडेच धाव घेतली. खासगी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी नसली तरी ठाणे, नवी मुंबईतील खासगी कार्यालयांमध्येही कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे या कर्मचाऱ्यांनीही रेल्वे स्थानकांवर गर्दी के ली होती.

एटीव्हीएम बंदच

गेल्या काही महिन्यांपासून फक्त सरकारी, आरोग्य कर्मचारी, पालिका कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा होती. प्रवासी कमी असल्याने कुणीही गैरफायदा घेऊ नये म्हणून मध्य व पश्चिम रेल्वेवरील एटीव्हीएम बंदच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारी तिकीट खिडक्यांसमोर प्रचंड गर्दी झाली. एटीव्हीएम नसल्याने तिकीट मिळवताना प्रवाशांचा बराच वेळ जात होता.

बंद तिकीट खिडक्या पुन्हा सुरू

वाढणारी गर्दी पाहून मध्य रेल्वेकडून बंद असलेल्या तिकीट खिडक्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. नेहमी २२८ तिकीट खिडक्या सुरू असतात. ठाणे स्थानकात दोन, कल्याणमध्ये तीन, डोंबिवलीत एक, दिवा, कु र्ला, जीटीबी नगर, चुनाभट्टी स्थानकांत प्रत्येकी एक अतिरिक्त खिडकी सुरू करण्यात आली. होणाऱ्या गर्दीची माहिती घेऊन त्याप्रमाणे तिकीट खिडक्या सुरू के ल्या जात असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

 

निर्बंध शिथिल झाल्यानंतर रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांसमोर आणि स्थानकात बरीच गर्दी झाल्याचे दिसले. सरकारीबरोबरच खासगी कार्यालय कर्मचाऱ्यांनाही लोकल प्रवासाची परवानगी दिली का, असा प्रश्न पडला आहे. ओळखपत्र व तिकीट तपासणीसाठी स्थानकातील प्रवेशद्वारांवरही पोलीस किं वा तिकीट तपासनीसही अनेक ठिकणी नव्हते. या गर्दीमुळे करोनाचा संसर्ग पुन्हा धोकादायक ठरू शकतो. – लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय प्रवासी महासंघ

वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेता सोमवारपासून विविध स्थानकांत तैनात के ल्या जाणाऱ्या लोहमार्ग पोलिसांचे मनुष्यबळही वाढवण्यात आले आहे. त्यांच्या जोडीला रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान आणि होमगार्डही आहेत. – एम. एम. मकानदार, पोलीस उपायुक्त, मध्य रेल्वे