संपूर्ण हाताळणी रेलटेल कंपनीकडे, तांत्रिक कारणास्तव गुगलची माघार

मुंबई : रेल्वे स्थानकांतील वायफाय सेवा ही सुरूच राहणार असून यातील हार्डवेअर असलेल्या गुगल कंपनीने मात्र माघार घेतली आहे. त्यामुळे या हार्डवेअरच्या देखभालीची जबाबदारी रेलटेल कंपनीने घेतली असून वायफाय सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रवाशांना मोफत वायफाय उपलब्ध झाल्यास त्यांचे पैसे वाचतील आणि इंटरनेटवरील माहितीही विनाअडथळा व वेगाने मिळेल. त्यामुळे देशभरातील ४०० स्थानकांवर वायफाय सेवा देण्याची घोषणा माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. २०१५ मध्ये गुगल व रेल टेल यांनी मिळून मोफत वायफाय सेवा सुरू केली. प्रथम पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेन्ट्रल स्थानकात या सेवेला प्रारंभ झाला. त्यानंतर याचा अवाका आणखी वाढवला. २०२० च्या मध्यापर्यंत ४०० स्थानकांवर ही सुविधा देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र हा आकडा २०१८ मध्येच पार करण्यात आल्याचे सांगून गुगलने काही तांत्रिक मुद्दय़ांमुळे या सेवेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.

त्यामुळे देशभरातील रेल्वे स्थानकातील वायफाय सुविधा बंद होत असल्याचे प्रथम समोर आले. मात्र मध्य व पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीत ही सेवा प्रवाशांसाठी सुरूच राहणार असल्याचे सांगितले. मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देण्यात येत असलेल्या वायफाय सुविधेत हार्डवेअर हे गुगल कंपनीचे होते. तर रेलटेलकडून वायफाय मिळत होते. गुगलने माघार घेतली असली तरी त्यांच्या हार्डवेअरची जबाबदारी रेलटेलने घेतली आहे. हार्डवेअर हाताळणे व त्याची देखभाल ही सध्या तरी रेलटेल करणार असून वायफाय सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १०४ स्थानकांपैकी २२ स्थानकांवर वायफाय सुविधा देण्याचे बाकी आहे. हे कामही मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. तर पश्चिम रेल्वेवरील मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनीही वायफाय सुविधा सुरूच राहणार असल्याचे सांगितले. हार्डवेअर गुगलचे होते. मात्र यातून माघार घेतली असली तरीही हार्डवेअरची जबाबदारी रेलटेलने घेतली आहे. अन्य कंपनीचेही सहकार्य घेतले जाण्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण पश्चिम रेल्वेवरील ४४० स्थानकात वायफाय सुविधा आहे. यातील मुंबईतील ३७ उपनगरीय स्थानकातील बहुतांश स्थानकात वायफायची सेवा असल्याचे भाकर म्हणाले.