चर्चगेट ते डहाणूपर्यंतच्या १६६ फलाटांची उंची वाढविल्याची पश्चिम रेल्वेची माहिती

प्रवाशांकरिता जीवघेणे ठरणारे रेल्वे फलाट आणि गाडीमधील अंतर कमी करण्यात रेल्वेला यश आले आहे.

गेल्या काही वर्षांत लोकल गाडय़ा, मेल-एक्स्प्रेस आणि फलाटांमधील रिकाम्या जागेत पडून प्रवासी गंभीर जखमी तसेच मृत होण्याच्या घटना घडत होत्या. मात्र आता या घटना पश्चिम रेल्वेवर होणार नाहीत, असा दावा पश्चिम रेल्वेकडून करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते डहाणूपर्यंतच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांच्या १६६ फलाटांची उंची वाढविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

फलाट आणि लोकल गाडय़ांमधील रिकाम्या जागेत प्रवासी पडून अनेक प्रवाशांचा जीव जातो. २०१४ मध्ये मोनिका मोरे या विद्यार्थिनीला घाटकोपर स्थानकात अशा प्रकारे झालेल्या अपघातात दोन्ही हात गमवावे लागले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून यावर काम केले जात होते.

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरारदरम्यान १४५ फलाट, तर वैतरणा ते डहाणूदरम्यान २१ फलाटांची उंची वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले. या फलाटांची उंची ९०० मिमी वाढविण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.ही कामे पूर्ण करण्यासाठी लोकल गाडय़ा बंद ठेवल्यानंतर मिळालेल्या वेळेतच पूर्ण करावी लागत होती. त्यानुसार हे काम पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. फलाटांची उंची वाढविण्याच्या कामासाठी ३० कोटी रुपये खर्च आला. २०१५ मध्ये पश्चिम रेल्वेवर लोकल गाडय़ा, मेल-एक्स्प्रेस आणि फलाटांमधील रिकाम्या जागेत पडून झालेल्या अपघातात २८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. २०१६ मध्ये हीच संख्या ७ आणि २०१७ मध्ये १० पर्यंत पोहोचली.