News Flash

फटका गँगसमोर मध्य रेल्वे हतबल

गेल्या पाच दिवसांत अशा दहा घटनांमध्ये चोरीच्या उद्देशाने प्रवाशांवर हल्ले करण्यात आले.

सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्था वाढवूनही लुटारूंची दहशत कायम; कुर्ला, जीटीबी स्थानकांजवळ प्रवाशांवर हल्ले

लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांच्या हातातील मोबाइल किंवा पर्स लंपास करणाऱ्या फटका गँगसमोर मध्य रेल्वे यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र आहे.गेल्या पाच दिवसांत अशा दहा घटनांमध्ये चोरीच्या उद्देशाने प्रवाशांवर हल्ले करण्यात आले. एकटय़ा जीटीबी नगर स्थानक परिसरातच पाच गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे.

लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करताना अनेक प्रवासी मोबाइलवर बोलतात. काहींच्या बॅगा खांद्याला अडकवलेल्या असतात. हीच संधी रुळांलगत दबा धरून बसलेले चोर साधतात. रुळांच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबांच्या जवळच किंवा झाडांमध्ये लपून बसलेले लोखंडी किंवा लाकडी वस्तूने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांच्या हातावर जोरदार फटका मारतात. फटका गँग म्हणून कुख्यात असलेल्या या चोरांविरोधात जानेवारी ते ऑगस्ट २०१९ पर्यंत २८१ पेक्षा जास्त गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. वडाळा हद्दीत सर्वाधिक ५२ घटना घडल्या असून वडाळा ते जीटीबी नगरदरम्यान २५ आणि किंग्ज सर्कल ते वडाळादरम्यान  १२ घटनांची नोंद आहे.

या घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी स्वतंत्र कर्मचारी रुळांजवळ तैनात केले; परंतु त्यानंतरही या गुन्ह्य़ांना आळा बसलेला नाही. गेल्या सहा दिवसांत फटका गँगविरोधात एकूण दहा गुन्ह्य़ांची नोंद झाली असून एकटय़ा जीटीबी स्थानकाजवळच पाच गुन्हे घडले आहेत. यामध्ये ४ ऑक्टोबरला जीटीबी स्थानकाजवळच झालेल्या सलग तीन गुन्ह्य़ांची नोंद वडाळा लोहमार्ग पोलिसांकडे झाली. जीटीबी नगर स्थानकातून सुटलेली लोकल लकी पेट्रोल पंपाजवळील पुलाजवळून जाताच रुळाजवळ उभे असलेल्या अज्ञात व्यक्तीकडून प्रवाशाच्या हातावर जोरदार फटका मारून मोबाइल चोरीला नेल्याच्या घटना घडत आहेत, तर कुर्ला, कल्याण लोहमार्ग हद्दीतही अशा गुन्ह्य़ांची नोंद ऑक्टोबर महिन्यात झाली आहे.

फसलेल्या उपाययोजना

  •   मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील रुळांजवळ लोहमार्ग पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा दल आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात केले आहेत; परंतु त्यानंतरही घटनांना आळा बसलेला नाही.
  •   २५ पेक्षा जास्त ठिकाणी रुळांजवळ सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन आहे; परंतु एक महिना उलटूनही त्याला मुहूर्त मिळालेला नाही. अद्यापही हा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून पुढे सरकलेला नाही.
  •  मध्य रेल्वे सुरक्षा दलाने फटका गँग व अन्य गुन्ह्य़ांना आळा घालण्यासाठी वॉच टॉवर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यात टॉवरवर उभे राहून जवानाकडून रेल्वे हद्दीतील टेहळणी केली जाईल. जागा उपलब्ध असल्याने प्रथम शहाड ते आंबिवलीदरम्यान हा टॉवर बनवला जाईल. हा प्रस्तावही पुढे सरकलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 12:39 am

Web Title: railway subway cctv security akp 94
Next Stories
1 ‘तुटपुंजी वाढ नको, तर अर्ज भरा’
2 रेल्वे पोलिसांकडून ‘कोम्बिंग ऑपरेशन’
3 ‘आरे’चे वारे बाधणार?
Just Now!
X