राज्यातील काही नियोजित रेल्वे मार्ग असे आहेत की ज्याचा फक्त अर्थसंकल्पात उल्लेख होतो वा त्यांच्यासाठी कामचलाऊ आर्थिक तरतूद केली जाते. पण वर्षांनुवर्षे या मार्गावरील रुळांची लांबी काही वाढलेली दिसत नाही. रेल्वेने हात आखडता घेतल्याने राज्य सरकारने काही मार्गांसाठी आर्थिक भार उचलला तरीही या प्रकल्पांची गाडी धिम्या मार्गावरूनच सुरू आहे. एकूणच राज्यातील रेल्वे प्रकल्पांची वर्षांनुवर्षांची रडगाथा संपलेली नाही आणि संपण्याची शक्यता दिसत नाही.
प्रत्येक भागातील नागरिकांची आपल्या भागात रेल्वे सेवा सुरू व्हावी, अशी अपेक्षा असते. एकूणच आर्थिक गणित लक्षात घेता सर्वच भागांमध्ये रेल्वे सुरू करणे शक्यही नाही. रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या मुंबई वा महाराष्ट्राकडे मात्र रेल्वे खात्याचे नेहमीच दुर्लक्ष होते. मग केंद्रात सरकार काँग्रेसचे असो वा भाजपचे. दिल्लीचा महाराष्ट्राबद्दलचा आकस रेल्वे खात्यातही प्रकर्षांने जाणवतो. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राबविण्यात आलेल्या मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत बऱ्यापैकी सुधारणा झाली असली तरी मुंबईकरांचे हाल काही कमी झालेले नाहीत.
रेल्वेचे मंत्रिपद भूषविणाऱ्याच्या राज्याला नेहमीच झुकते माप मिळते. जमा होणाऱ्या महसूलाचे सर्व राज्यांमध्ये समान वाटप करावे लागते. एकाच राज्याला अपवाद करून चालत नाही. हे लक्षात घेऊन राज्यातील आठ रेल्वे मार्गांसाठी ५० टक्क्यांपर्यंत खर्चाचा वाटा उचलण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली. महाराष्ट्र सरकारने खर्च करण्याची तयारी दर्शवूनही आठपैकी दोनच मार्गाना रेल्वे बोर्डाने मान्यता दिली. अद्यापही सहा मार्गासाठी रेल्वे बोर्डाचा अभ्यासच सुरू आहे.
३३ प्रकल्पांसाठी राज्य शासन आग्रही
राज्यातील ३३ रेल्वे प्रकल्प मार्गी लागावेत म्हणून राज्याने केंद्राकडे पाठपुरावा केला आहे. यापैकी आठ प्रकल्पांकरिता निम्मा खर्च करण्याची तयारीही राज्याने दाखवली आहे. आठ नवीन मार्ग व्हावेत म्हणून राज्याची मागणी आहे. दुहेरीकरणाचे सात तर रुंदीकरणाचे तीन मार्ग सुरू करण्याची मागणी आहे.
रखडलेले राज्यातील काही महत्त्वाचे मार्ग
नगर-बीड-परळी वैजनाथ (काम सुरू पण गती संथ), वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड, मनमाड-इंदूर व्हाया मालेगाव, धुळे, शिरपूर, नरडाणा, वडसा-देसाईगंज-आरमोरी-गडचिरोली, पुणे-नाशिक, कराड-चिपळूण, नागपूर-नागभीड, बारामती-लोणंद, डहाणू-नाशिक, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद, जालना-खामगाव, कल्याण-माळशेज-नगर, कोल्हापूर-कणकवली, सोलापूर-बीड-जालना-बुलढाणा, सोलापूर-औरंगाबाद-जळगाव, शिर्डी-शहापूर, कोल्हापूर-वैभववाडी.
दुहेरीकरण
पनवेल-पेण, नागपूर-छिंदवाडा, कलमना-नागपूर, जळगाव-उधना-सुरत, पुणे-मिरज-कोल्हापूर (रेल्वे बोर्डाकडून स्थगिती), दौंड ते मनमाड, मुदखेड-नांदेड-मनमाड
रुंदीकरण
यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूर, पाचोरा-जामनेर .