News Flash

दळण आणि ‘वळण’ : जरा अदबीने बोला..

रेल्वेवर प्रेम करणाऱ्यांचा ‘रेल्वे लव्हर्स’ नावाचा एक ग्रुप आहे. ही एक वेगळीच जमात आहे.

रेल्वेतील काही नोकऱ्या किंवा काही पदे यांचा प्रवाशांशी कधीच काहीच थेट संबंध येत नाही, तर काही पदांवरील व्यक्ती अगदी दर दिवशी प्रवाशांच्या संपर्कात असतात. त्यांच्या एकंदरीत वागण्या-बोलण्यातून प्रवाशांच्या मनातील रेल्वेची प्रतिमा चांगली-वाईट होत असते. त्यापकीच एक म्हणजे तिकीट खिडकीवर बसून तिकीट देणारा तिकीट बुकिंग क्लार्क..

रेल्वेवर प्रेम करणाऱ्यांचा ‘रेल्वे लव्हर्स’ नावाचा एक ग्रुप आहे. ही एक वेगळीच जमात आहे. डेक्कन क्वीन जात असताना स्तब्ध उभी राहून तिला सलामी देणारी जमात! रेल्वेची कार्यपद्धती, त्यातील अनेक किचकट बाबी अशा सगळ्या गोष्टींची खडानखडा माहिती या लोकांकडे असते. रेल्वेमधील किरकोळ बिघाडांकडे समजूतदारपणे काणाडोळा करणारी ही माणसे! पण रेल्वेतील काही पदांबाबत कदाचित त्यांच्याही मनात अढी असेल, तर सर्वसामान्य प्रवाशांची काय कथा! यातील एक पद म्हणजे तिकीट खिडक्यांवर बसून तिकिटे देणारे तिकीट बुकिंग क्लार्क!

रेल्वेने पहिल्यांदा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा रेल्वे कर्मचाऱ्यांपकी सर्वात पहिला याच बुकिंग क्लार्कशी संबंध येतो. तिकीट खिडकीसमोरील लांबच लांब रांगेत १५-२० मिनिटे उभे राहिल्यानंतर आपला नंबर येतो. वांद्रय़ाहून बोरिवलीला जाण्यासाठी किंवा अशाच अंतरासाठी एक सिंगल तिकीट काढायला आपण १०० रुपये पुढे सरकवतो आणि आतून ‘पाच रुपये सुटे द्या’ असा आवाज येतो. आपल्याकडे सुटे नसतात आणि वादाची ठिणगी तिथेच पडते. तिकीट बुकिंग क्लार्कशी आपला येणारा हा एवढाच संबंध तिकीट खिडकीवर बसणाऱ्या तमाम क्लार्क्‍सबद्दल आणि एकंदरीत रेल्वेबद्दल आपल्या मनात एक ओरखडा उमटवून जातो. सुटे पसे असले, तर समोर दिसणाऱ्या हातातून येणारे तिकीट घेण्यापलीकडे आणि अगदीच आदबशीर असलो, तर त्यांना ‘थँक यू’ म्हणण्यापलीकडे आपले कधी संभाषणही होत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर असलेली आव्हाने समजून घेण्याची वेळही आपल्यावर येत नाही. आता एक प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे, ‘तिकीट खिडकीशी बसून तिकिटे फाडण्यात कसली मोठी आव्हाने आली!’ प्रश्न प्रवाशांच्या बाजूने रास्त आहे, पण या प्रश्नाच्या दुसऱ्या बाजूनेही विचार व्हायला हवा.

उपनगरीय तिकीट खिडक्यांवर बुकिंग क्लार्क म्हणून काम करणाऱ्यांसमोरील ही आव्हाने जाणून घेतली, तर कदाचित खिडकीवर होणारी भांडणे काही प्रमाणात कमी होतील. तिकीट बुकिंग क्लार्क हे शिफ्टमध्ये किंवा पाळ्यांमध्ये कामे करतात. त्यात सकाळ, मध्यान्ह आणि रात्री अशा तीन पाळ्या असतात. प्रत्येक पाळी आठ तासांची असते आणि त्या आठ तासांमध्ये जेवणासाठी वा चहा-नाश्त्यासाठी फक्त २० मिनिटांचा अल्पविराम मिळतो. तसेच एका पाळीत काम करणारा क्लार्क दुसऱ्या पाळीचा क्लार्क आल्याशिवाय तिकीट खिडकी सोडून जाऊ शकत नाही. कधीकधी त्या पाळीच्या क्लार्कला काही कारणांमुळे डय़ुटीवर येता येत नाही. अशा वेळी पहिल्या पाळीसाठी आलेला क्लार्कच दुसऱ्या पाळीतही काम चालूच ठेवतो. कल्पना करा, भाऊबिजेचा म्हणजेच सणासुदीचा दिवस आहे. आज कोणाशी म्हणजे कोणाशीच भांडायचे नाही, असे ठरवून तुम्ही सकाळी सव्वासहा वाजता तिकीट खिडकी उघडली आहे. प्रसन्न चेहऱ्याने पहिले तिकीट फाडण्यासाठी तुम्ही सज्ज असताना समोर तशीच छान तयार होऊन आलेली व्यक्ती पाच रुपयांच्या तिकिटासाठी तुमच्यासमोर ५०० रुपयांची नोट ठेवते. तुम्ही अदबीने सुटे नाहीत, असे सांगता. प्रवासी व्यक्ती ‘तुम्हाला सुटे ठेवायला काय जाते’, या प्रश्नाने सुरुवात करते आणि मग वाद अटळ होतो.

आता यात दर वेळी प्रवाशांचीच चूक असते, असे नाही. कधीकधी आगळीक क्लार्ककडूनही होते. पण विचार करा, एका प्रवाशाला एकाच तिकीट बुकिंग क्लार्कला एकाच तिकिटासाठी सामोरे जायचे असते. त्या खिडकीत बसलेली व्यक्ती मिनिटाला एक या दराने प्रवाशांना तिकीट देत असते. सुरुवातीला अगदी नम्रपणे बोलणारे क्लार्कही दहा-पंधरा-वीस प्रवाशांनंतर नसíगकरीत्या उर्मट होतात. अनेकदा या क्लार्कना एकाच दिवशी तीन तीन पाळ्यांमध्येही काम करावे लागते. सहा दिवस काम केल्यानंतर क्लार्कला एक दिवस आरामासाठी सुटी मिळते. पण सध्या क्लार्कचा तुटवडा असल्याने या आरामाच्या दिवशीही कधीकधी कामावर यावेच लागते. सणावाराच्या दिवशी सुटी नाही, शनिवार-रविवार या सुटय़ांच्या दिवशी जास्त काम आहे, यामुळे या कर्मचाऱ्यांना कुटुंबाबरोबर वेळ घालवणेही अनेकदा शक्य होत नाही.

बुकिंग क्लार्क डय़ुटीवर आल्यानंतर सर्वप्रथम त्याला त्याच्याकडे असलेली खासगी रक्कम जाहीर करावी लागते. डय़ुटी संपताना त्याच्याकडे एवढीच रक्कम असणे अपेक्षित असते. त्यातील काही खर्च झाली, तरी त्याचा हिशेब त्याला द्यावा लागतो. तिकीट घेतल्यानंतर कधीकधी प्रवासी दोन रुपये नंतर आणून देतो, असे सांगून जातात आणि परत येत नाहीत. प्रवाशांच्या दृष्टीने दोन रुपये ही क्षुल्लक रक्कम असते. पण डय़ुटी संपताना तिकीट बुकिंग क्लार्कला त्याने त्याच्या डय़ुटीच्या वेळी काढलेली तिकिटे आणि त्यांच्यापोटी जमा झालेली रक्कम पडताळून पाहावी लागते. त्या वेळी हे कमी असलेले दोन रुपये त्याला त्याच्या खिशातून भरावे लागतात. एवढेच नाही, कधीकधी धाड पडली, तर या दोन रुपयांसाठी त्याच्यावर आरोपपत्रही लावले जाते. एखाद्या तिकीट खिडकीवर प्रवाशाची आणि कर्मचाऱ्याची एकमेकांसोबत हुज्जत झाली, तर प्रवासी कधीकधी तो राग मनात ठेवून क्लार्कची तक्रार करतात. मग त्या चौकशीच्या फेऱ्यात अनेकदा बुकिंग क्लार्कच्या सेवा कालावधीचे अनेक महिनेही जातात. तिकीट बुकिंग क्लार्क हा काही ठरवून प्रवाशांशी भांडण्यासाठी तिकीट खिडक्यांवर बसत नाही. सुटय़ा पशांची चणचण प्रवाशांप्रमाणे रेल्वेलाही भेडसावते. अशा वेळी दोन्ही पक्षांनी आपापली डोकी शांत ठेवून व्यवहार केले, तर कदाचित प्रवाशांनाही झटपट तिकिटे मिळू शकतील आणि तिकीट बुकिंग क्लार्कचे कामही सुसह्य होईल.

रोहन टिल्लू -tohan.tillu@expressindia.com

@rohantillu

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 3:41 am

Web Title: railway ticket booking clark
Next Stories
1 गॅलऱ्यांचा फेरा : कलागुरूचे दृश्यस्मरण..
2 सहज सफर : निसर्गसौंदर्याची उधळण!
3 कर्जहप्ता भरण्यास आणखी मुदतवाढ
Just Now!
X